पुन्हा एकदा आणीबाणी!
फेब्रुवारी महिन्यात बिल गेट्स यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना नवीन महामारी लवकरच येईल; आणि तिचा विषाणू कोरोना व्हायरस फॅमिलीतील नसेल असे भाकित वर्तविले होते. ते आता शब्दश: खरे होताना दिसत आहे. मागील दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे जग होरपळून निघाले. आता; जगभरात पुन्हा एकदा आणीबाणीचा प्रसंग ओढावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ’मंकीपॉक्स’ या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता व्यक्त करत ही जगासाठी आणीबाणी असल्याचे जाहीर केले आहे. आजवर मंकीपॉक्सचा प्रसार जगातील सुमारे 80 देशात झाला असून सुमारे 17 हजार रुग्ण यामुळे बाधित झाले असल्याची माहिती आहे. अत्यंत वेगाने हा रोग पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, कॅनडा, पोर्तुगाल, बेल्जियम या देशांना या रोगाने कवेत घेतले असून पाच व्यक्तींचा मृत्यू यामुळे झाला असल्याची माहिती आहे. भारतातही या रोगाचे चार रुग्ण आढळले आहेत. 14 जुलै रोजी सर्वप्रथम केरळमध्ये या रोगाचा पहिला रुग्ण आढळला. 18 जुलै रोजी केरळमध्येच दुसरा रुग्ण आढळला आणि 22 जुलै रोजी केरळमध्ये तिसर्या रुग्णाची नोंद झाली. यातील पहिला रुग्ण परदेशातून प्रवास करून आला होता. त्याला परदेशात या रोगाची बाधा झाली असावी असा कयास प्रथम देशाच्या आरोग्य यंत्रणेने बांधला होता. तथापि दि. 24 जुलै रोजी दिल्लीमध्ये या रोगाचा एक संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला. त्याला परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. यामुळे आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. भारतीय आरोग्य यंत्रणेने या संदर्भात मार्गदर्शक तत्वे नुकतीच जारी केली आहेत. पुण्यातील पाषाण येथे असलेल्या विषाणू संशोधन संस्थेमध्ये या संदर्भात अधिक संशोधन सुरु आहे. या संथेतील डॉ. प्रज्ञा यादव आणि डॉ. रीमा सहाय यांची नावे संस्थेने देशातील अन्य वैद्यक यंत्रणांसाठी तज्ज्ञ संपर्क व्यक्ती म्हणून जाहीर केली आहेत.
हा जुनाच आजार
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणू गोवर, कांजिण्या यासारख्या रोगांच्या विषाणूंशी साम्य असलेला, ’ऑर्थोपॉक्स’ कुटुंबातील विषाणू आहे. हा काही नवा रोग नाही. याचा पहिला संसर्ग 1958 साली वैद्यकीय चाचण्यांसाठी पाळलेल्या काही माकडांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर पहिला मानवी रुग्ण 1970 मध्ये काँगो प्रजासत्ताकामध्ये आढळला होता. याचा उद्भव प्रामुख्याने ऑफ्रीकन उपखंडात झाल्याचे दिसून येते. याचा संसर्ग वेगाने होऊ लागल्याने जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. युरोपियन उपखंडातील देश वेगाने या संसर्गाच्या कचाट्यात सापडत आहेत. ही स्थिती पाहिल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या इमर्जन्सी कमिटीची बैठक तातडीने झाली. या बैठकीत तज्ज्ञांनी आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस केली. या रोगाची नेमकी शास्त्रीय माहिती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळेही जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर या रोगामुळे थोडे का होईना परंतू मृत्यू झाल्यामुळे त्यापासून मानवाला धोका आहे. असेही जागतिक संघटनेला वाटले आहे. या रोगामुळे होणारा मानवी मृत्यूदर सुमारे दहा टक्के असल्याचे आरोग्य विषयक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सर्व बाबी पुन्हा एकदा नवी महामारी येण्याचा संकेत देत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल डॉ. टेड्रोस अॅधानोम घेब्रिएसस यांनी या विषयी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना योग्य उपचार तर द्यावेतच पण त्यांना वेगळी हीन दर्जाची वागणूक देऊ नये तसेच या आव्हानाचा सामना करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, जनजागृती करावी असेही आवाहन डॉ. टेड्रोस यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील डायरेक्टर पूनम क्षेत्रपाल सिंग यांनीही या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशाने काळजीपूर्वक पावले उचलावीत असे आवाहन केले आहे.
लक्षणे आणि घ्यावयाची काळजी
या रोगाची लक्षणे डोकेदुखी, ताप, ग्रंथींची सूज, स्नायूदुखी, स्त्रावाने भरलेले फोड, पाठदुखी, कंबरदुखी आणि शरीराला कंप सुटणे अशी सध्यातरी दिसून येत आहेत. ही लक्षणे सुमारे दोन ते चार आठवडे दिसून येतात असे वैज्ञकिय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ’स्मॉलपॉक्स’ या रोगावर अस्तित्वात असलेली लस मंकीपॉक्सवर 85 टक्के परिणामकारक असल्याची माहिती आरोग्यविषयक संस्थांनी दिली आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीने अन्य लोकांच्या संपर्कात कमी यावे. वारंवार आपले तोंड स्वच्छ करावे अशीही सूचना आरोग्य विषयक तज्ज्ञांनी दिली आहे.
आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीप्रमाणे या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप येणे, लसिकाग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे आढळून येतात.
कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो. या आजारामुळे न्यूमोनिया, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये अंधत्व येण्याची शक्यताही नाकारता येेत नाही.) आदी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
आजाराचा अधिशयन कालावधी (इनक्युबेशन पिरियड) 6 ते 13 दिवस असला तरी हा कालावधी 5 ते 21 दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी 1 ते 2 दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो. अशा रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
दोन व्यक्तींमध्ये थेट शारीरिक संपर्क आल्यास, लैंगिक संपर्क किंवा जखम, यातील स्त्राव निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या संपकात आल्यास, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणार्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
प्रयोगशाळेत पी.सी.आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या कपड्यांशी अथवा अंथरुण पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवावी, आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुणांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर केला जावा अशा सूचना आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत.
या रोगाचा एखादा रुग्णही साथ निर्माण होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेस वात असल्याने प्रत्येक संशयित रुग्णाची तपासणी तातडीने केली जाणार आहे. रुग्णाचे रक्त, रक्तद्रव, अंगावर आलेल्या फोडांमधील द्रव आणि मूत्राचे नमुने संकलित करुन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत चाचणीसाठी पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवून उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
या रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्याघरी वेगळ्या खोलीत ठेवावे. या ठिकाणी स्वतंत्र वायुविजन व्यवस्था असावी. रुग्णाने त्रिस्तरीय मुखपट्टीचा (ट्रिपल लेयर मास्क) वापर करावा. कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकण्यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट असा पोषाख वापरावा. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तो पर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे. रुग्णाने पुरेसे पाणी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. त्याचबरोबर सकस अन्न घ्यावे असेही आरोग्य यंत्रणेने सुचविले आहे.
डोळ्यात वेदना होणे अथवा दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे, शुद्ध हरवणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, तोंडावाटे अन्नपाणी न घेणे, प्रचंड थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रुग्णाच्या निकटच्या व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे आढळत आहेत का याची पाहणी करण्यासाठी पुढील 21 दिवस त्याव्यक्तींचा दैनंदिन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याला ताप आल्यास त्याचा प्रयोगशाळा नमुना घेतला जावा. लक्षणे नसली तरीदेखील या सर्वेक्षण कालावधीमध्ये निकटसहवासिताने रक्तदान, अवयवदान अशा बाबी करु नयेत. निकटसहवासित शाळकरी मुलांना सर्वेक्षण कालावधीमध्ये शाळेत जाऊ देऊ नये. अशा सूचनाही आरोग्य यंत्रणेने केल्या आहेत.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो. त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास त्याचे तात्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे. अशी सूचनाही आरोग्य यंत्रणेने केली आहे.
काळजी घेणे आपल्या हाती
भारतासारख्या लोकसंख्येच्यादृष्टीने जगात दुसर्या क्रमांकाच्या असलेल्या देशात हे रुग्ण आढळणे ही चिंतेची बाब आहे. सध्या मंदीच्या लाटेमुळे जगात महागाई वाढली आहे. भारतही या समस्येचा सामना करत आहे. त्यातच भारत सरकारने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यासह देश विदेशातील वित्तीयसंस्थांकडून काढलेल्या कर्जांमुळे मुळातच देशावर आर्थिक ताण आहे. सप्टेंबर महिन्यात देशाला काढलेल्या कर्जाचा मोठा हप्ता चुकवावा लागणार आहे. तो चुकविल्यानंतर देशातील डॉलर्सची गंगाजळी सुमारे 35 ते 40 टक्क्यांनी कमी होईल. त्याचा परिणाम आयातीवर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ वर्तवित आहेत.
याशिवाय यंदा पावसाचा पॅटर्नही बदलल्यासारखा वाटत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम अन्नधान्याच्या उत्पन्नावर होईल की काय अशीही भिती आहे. पुन्हा या नव्या रोगाच्या लाटेचा सामना करण्यासाठी देशात नवे निर्बंध लादले गेले तर, देशाची अर्थव्यवस्था कितपत तग धरेल अशी शंका जागरूक नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. काहीही असो आलेल्या संकटाचा एकजुटीने आणि शिस्तबद्धरित्या करणे एव्हढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता या रोगापासून आपला बचाव होण्यासाठी काळजी घ्यावी.
-----
पुन्हा एकदा आणीबाणी!
Reviewed by ANN news network
on
July 27, 2022
Rating:

No comments: