अमित शहा यांच्या विधानाचा मथितार्थ कोणता?

अमित शहा यांच्या विधानाचा मथितार्थ कोणता? या महिन्याच्या सुरुवातीस भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय बैठक हैदराबाद येथे झाली. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकारणातील घराणेशाहीवरही टीका करत पुढील 30 ते 40 वर्षे देशाच्या राजकारणात भाजपचे युग असेल, असे म्हटले आहे. शहा यांचा हा दावा कितपत वस्तुस्थितीला धरून आहे  याचा अंदाज घ्यायचा झाला तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश राजवटीपासून ते आजपर्यंत देशातील राजकीय घडामोडींवर नजर टाकावी लागेल. सर्वसाधारणपणे सन 1757 ते 1947 या कालावधीत भारतावर ब्रिटिशांची जवळपास एकहाती सत्ता होती. त्यामुळे या कालखंडाला ब्रिटिश युग म्हणावे लागेल. भारतीय जनतेच्या मनातील असंतोष उफाळून आल्यानंतर 1947 साली इंग्रजांनी हा देश सोडून परत मायदेशी जाणे पसंत केले. त्यानंतर म्हणजेच 1947 ते 1989 हा कालखंड काँग्रेसच्या देशातील एकछत्री राजवटीचा होता. 1989 नंतर 2014 पर्यंत देशात एकप्रकारे राजकीय अस्थिरता होती. कोणत्याही पक्षाचे निर्विवाद बहुमत मिळालेले सरकार या कालावधीत सत्तेवर नव्हते.2014 साली मात्र हे चित्र बदलले आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्ण सरकार बहुमतात सत्तेवर आले. ते आजतागायत सत्तेवर आहे. शहा यांनी पुढील 30 ते  40 वर्षांचे जे भाकित वर्तविले आहे ते देशाच्या मागील इतिहासाचा आढावा घेऊन वर्तविले असावे. या देशात इंग्रजांची राजवट अस्तित्वात आली त्यापूर्वी देशात अनेक ठिकाणी वेगवेगळी राज्ये आणि राजे अस्तित्वात होते. त्यातील मराठा राजवट अत्यंत प्रबळ राजवट होती. असे असताना या सर्वांनी ब्रिटिशांसमोर गुडघे का टेकले याचे कारण जाणून घेतले की शहा यांचा वरील दावा खरा की खोटा हे कळण्यास मदत होणार आहे.  ब्रिटिशांनी जेव्हा या देशात पाऊल ठेवले तेव्हा मराठ्यांची सत्ता जवळपास संपूर्ण देशात होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपतींचे सरदार शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नेवाळकर हे महाराष्ट्राबाहेर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या संपन्न प्रदेशात राजवट करत होते. कान्होजी आंग्रेंसारखा शूर आणि दर्यावर्दी सरदार समुद्रावर हुकुमत गाजवत होता. या सर्वांची हदशत ब्रिटिशांच्या मनात होती. असे असतानाही मराठे ब्रिटिशांसमोर हरले.  मुघल, टिपू सुलतान, पंजाब, बंगाल येथील राज्यकर्ते या सर्वांना ब्रिटिशांसमोर गुडघे टेकावे लागले. कारण या कोणत्याही राजवटीत पहिल्या फळीतील नेतृत्व एक व्यक्ती किंवा कुटुंब करत होते. मुख्य नेत्याच्या मागे नेत्यांची दुसरी फळीच तयार नव्हती. त्याउलट व्यापारासाठी या देशात आलेल्या ब्रिटिशांनी येथे आल्यानंतर साचेबद्ध (केडर बेस्ड) संघटना तयार केली. त्याचबरोबर त्यांनी येथील राजेरजवाड्यांशी लढताना शत्रू कमकुवत होईपर्यंत वाट पाहून वार करण्याचा आणि जरूर तर दोन पावले मागे येण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला. बलाढ्य मराठ्यांवर विजय मिळविणे सोपे नाही याची जाणीव झाल्यानंतर त्यांच्याबरोबर तह करून ब्रिटिश योग्य संधीची वाट पहात 1782 पासून 1802 पर्यंत शांत राहिले. मराठेशाहीतील सवाई माधवराव पेशवे, बाजीराव पेशवे, नाना फडणवीस यासारख्या लढाऊ आणि मुत्सद्दी लोकांचे निधन झाल्यानंतर आणि कर्तव्यशून्य दुसरा बाजीराव सत्तेवर आल्यानंतर मराठी सत्तेला हादरे देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम काय झाला हे आपणाला माहित आहेच. जी गत मराठ्यांची झाली; तीच गत देशातील अन्य राजवटींची झाली आणि भारतावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकू लागला. हे सर्व का घडले या प्रश्‍नाचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे या सर्वांकडे केडरबेस्ड नेतृत्वाचा अभाव होता. काँग्रेसची केडरबेस्ड रचना ब्रिटिशांच्या राजवटीला, जुलुमाला कंटाळलेल्या जनतेला सक्षम नेतृत्व नसल्यामुळे  त्यांच्याविरोधात लढा कसा उभारावा हे समजत नव्हते. वेगवेगळे नेते यासाठी झटत होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी होमरुल चळवळीची स्थापना केली. त्यांनी सर्वप्रथम ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एखादी केडरबेस्ड संघटना असणे आवश्यक आहे हे जाणले होते. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने टिळकांच्या मताप्रमाणे आवश्यक असलेला केडरबेस्ड ढाचा स्वीकारला. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यलढा चालू ठेवण्यासाठी पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील नेते तयार झाले. अखेरीस 1942 चा लढा सुरू झाला आणि ब्रिटिशांनी 1947 मध्ये  भारतातून काढता पाय घेतला. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. मात्र, केडरबेस्ड संघटनेमुळेच ब्रिटिशांशी काँग्रेसला लढा देता आला ही बाब अनेकदा दुर्लक्षिली जाते. ब्रिटिश निघून गेल्यानंतर देशाची सत्ता आपसूक काँग्रेसच्या हाती आली. ’हर घर काँग्रेस’ अशी स्थिती असल्यामुळे 1947 ते 1989 हा प्रदीर्घ कालखंड काँग्रेसचे राज्य देशावर होते.1964 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर 1967 पर्यंत लालबहाद्दूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी काँग्रेससह देशाची धुरा वाहिली. पण त्यानंतर मात्र, गांधी, नेहरू  घराण्याचे  काँग्रेसवर सतत वर्चस्व राहिल्याचे दिसते. 1989 नंतर देशातील काँग्रेसच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे आपल्याला दिसते. 1989 ते 2014 या काळात कोणताही पक्ष पूर्ण बहुमतात नव्हता त्यामुळे गठबंधन सरकारे सत्तेवर आली. मात्र त्यातून फारसे काही हाती लागत नाही हे लक्षात आल्यानंतर या देशातील जनतेने 2014 साली भारतीय जनता पक्षाला कौल दिला. त्यानंतरही पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता केंद्रात आली. प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न या कालावधीत भाजपने पक्ष संघटन मजबूत करणे आणि देशातील प्रादेशिक पक्ष संपविणे असा कार्यक्रम सुरू केला. त्याला बव्हंशी यश आल्याचे आपल्याला दिसते. महाराष्ट्रातील घडामोडी आपल्या डोळ्यासमोर आहेत. जे पक्ष अद्यापही तग धरून राहिलेले आहेत ते संपविण्यासाठी भाजपने ब्रिटिशांप्रमाणे ’वेट अँड वॉच’धोरण अवलंबले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील प्रादेशिक पक्ष हे व्यक्ती अथवा कुटुंबाच्या नेतृत्वाखाली चालणारे पक्ष आहेत. तृणमूल म्हणजे ममता बॅनर्जी, आप म्हणजे अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी  म्हणजे शरद पवार, बसपा म्हणजे मायावती, मुलायमसिंह यादव परिवार म्हणजे समाजवादी पार्टी, वायएसआर काँग्रेस म्हणजे जगनमोहन रेड्डी अशी प्रादेशिक पक्षांची स्थिती आहे. त्यांचे नेते बाजूला केले तर बाकी शून्य असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे भाजप आज ना उद्या हे पक्ष संपवणार असे चित्र आहे. काँग्रेसने पुनर्बांधणी करण्याची गरज या परिस्थितीत काँग्रेस हा एकमेव पक्ष भाजपच्या विरोधात टिकण्याची शक्यता आहे. मात्र, तेथेही केडर अस्तित्वात राहिले नसल्यामुळे भाजपवर विजय मिळवणे काँग्रेसलाही सहज सोपे राहिलेले नाही. त्यामुळेच अमित शाह पुढील 30 ते 40 वर्षे देशात भाजपचीच सत्ता राहील आणि इतिहासात हे भाजप युग म्हणून ओळखले जाईल असे म्हणत आहेत. भाजपने 2014 पासून या देशाच्या राजकारणावर मजबूत पकड मिळविली असून त्यांच्याकडे  घराणेशाहीचे  राजकारण दिसत नाही ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. आपण पाहिलेे तर मोदी यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीचे नाव त्यांचा वारसदार म्हणून पुढे येताना दिसत नाही त्या ऐवजी  त्यांचे वारसदार म्हणून अमित शहा, नितीन गडकरी ही नावे दिसतात. तर तिसर्‍या फळीमध्ये योगी आदित्यनाथ, त्यांच्या खालोखाल देवेंद्र फडणवीस यांचे नाव आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे काँग्रेसकडे आज राहुल गांधी वगळले तर पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व करू शकतील अशी दुसरी नावेच चर्चेत असलेली दिसत नाहीत.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजवर लढविलेल्या सुमारे 45 निवडणुकांमध्ये काँग्रेसला हार मानावी लागली आहे ही वस्तुस्थिती आहे.  याचाही एक नकारात्मक संदेश मतदारांमध्ये जातो आणि त्या तुलनेत भाजपचे पारडे अधिक जड असल्याचे भासल्यामुळे मतदार भाजपकडे वळतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. याशिवाय भाजपचा संस्थागत ढाचा मजबूत आहे. या पक्षाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटनात्मकदृष्ट्या बळकट असलेली मातृसंस्था याशिवाय विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासारख्या त्यांच्या सहाय्यक संस्था भाजपचा प्रसार करण्यासाठी सहाय्यभूत ठरताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या राजकारणाला जर शह द्यायचा असेल तर काँग्रसने केडरची पुर्नबांधणी करणे. दुसर्‍या फळीतील सक्षम नेतृत्व निर्माण करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तळागळातील कार्यकर्ते गोळा करणे. हे केल्याशिवाय काँग्रेसला भाजपवर विजय मिळविता येणे सध्यातरी शक्य नाही. या सर्व प्रकरणात दुसर्‍या एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. तो म्हणजे केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश वगळता गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, हरीयाणा, उत्तराखंड या राज्यातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 160 जागा भाजपला मागील कालावधीत मिळाल्याचे दिसते. त्यांनी या राज्यातील स्थानिक नेतृत्वातही फारसा बदल केल्याचे दिसत नाही. या जागा आणि उर्वरीत राज्यामधून ज्या मिळतील त्या जागा असे मिळून भाजप बहुमताचा आकडा कायम गाठत राहिल असे अमित शहा यांना त्यांच्या हैदराबादमधील त्या भाषणातून बहुधा सुचवावयाचे असावे. शहा यांच्या या विधानाचा हा अर्थ लक्षात घेतला तर काँग्रेसने नेमकी कशी पावले टाकली पाहिजेत ते स्पष्ट होते. नेतृत्वाने याचा विचार गंभीरपणे करणे आवश्यक आहे.
अमित शहा यांच्या विधानाचा मथितार्थ कोणता? <b>अमित शहा यांच्या विधानाचा मथितार्थ कोणता?</b> Reviewed by ANN news network on July 20, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.