ते पत्र केवळ माझ्या बदनामीसाठी
कृष्णप्रकाश यांचे स्पष्टीकरण
पिंपरी : गेले दोन दिवस प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर चर्चा सुरू असलेले ’ते’ पत्र केवळ माझ्या बदनामीच्या हेतूने प्रसारित केले जात आहे असा खुलासा पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आणि व्हि. आय. पी. सुरक्षा विशेष पोलीस उपमहानिरिक्षक, कृष्णप्रकाश यांनी अखेर शुक्रवारी रात्री उशिरा केला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकार्याने हा खुलासा माध्यमांना पाठविला आहे.
कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असताना त्यांचे वाचक म्हणून काम पहाणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक चारपानी पत्र पाठविण्यात आले असून त्यात कृष्णप्रकाश यांनी या परिसरातील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात हस्तक्षेप करून 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांनी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि काही दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी व नामांकित वृत्तपत्रांचे पत्रकार यांना हाताशी धरून तसेच त्यांना मोठमोठ्या रकमा देऊन आपली प्रसिद्धी करण्यास सांगितल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आला होता. या पत्रात काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या नावाचा समावेश असून त्यापैकी काहींना दिलेल्या मोठमोठ्या रकमांचाही उल्लेख आहे. त्यामुळे शहरातील पत्रकार जगतात अस्वस्थता पसरली आहे.
हे पत्र समाज माध्यमांवर फिरू लागल्यानंतर शुक्रवारी सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. त्यात मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेले पत्र आपण लिहिलेले नाही असे स्पष्ट करत हे पत्र पाठविणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली होती.
त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा कृष्णप्रकाश यांचा खुलासा माध्यमांकडे पोहोचला. त्यामध्ये असे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीसआयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारअर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे.
सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रारअर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापूर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम, आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी लोकांच्या आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझ्या कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही.
कृष्णप्रकाश यांच्या या खुलाशानंतर विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे डॉ. अशोक डोंगरे यांच्या निवेदनावर काय कारवाई करणार? हा खोडसाळपणा करणार्या त्या अज्ञातावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------
ते पत्र केवळ माझ्या बदनामीसाठी!; कृष्णप्रकाश यांचे स्पष्टीकरण
Reviewed by ANN news network
on
May 08, 2022
Rating:

No comments: