कृष्णप्रकाश यांनीच लावावा ’लेटर बॉम्ब’चा सोक्षमोक्ष !
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे तत्कालिन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर ’त्या’ लेटरबॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे कृष्णप्रकाश यांची जनतेमध्ये असणारी प्रतिमा डागाळली. त्यांनी शहरामध्ये आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये मटका, दारूचे अड्डे अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जी कारवाई केली त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढला. मात्र वर्षभरातच जमीनीच्या व्यवहारात हस्तक्षेप, एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यक्रमात सहभाग, त्याचबरोबर त्यांच्याविषयीच्या लेटरबॉम्बमुळे जी चर्चा रंगून वेगवेगळे तर्कवितर्क सुुरु झाले त्यामुळे त्यांच्याबाबतीत शहरवासीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कृष्णप्रकाश यांनी आपला याच्याशी काही संबंध नाही. आपली जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. असा खुलासाही केला. मात्र खुलाशावर जनतेचे समाधान होणार नाही. त्यामुळे त्यांनी आता स्वत:हून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुढे आले पाहिजे. जेणेकरून जनतेला माहिती पडेल की जाणीवपूर्वक हे कुभांड रचले आहे. आणि याबाबतीत जर त्यांनी कोणतीही पावले उचलली नाहीत तर या लेटरबॉम्बमध्ये दिलेली माहिती ही सत्य आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल. त्यामुळे आता त्यांनीच या प्रकरणाबाबतीत पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जनतेसमोर सत्य येईल.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे तिसरे आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश रुजू झाले. त्यावेळी शहरातील गुन्हेगारी, अनधिकृत धंदे, यामध्ये वाढ झाली होती. याशिवाय स्थानिक राजकीय नेत्यांच्या आश्रयाने गुन्हेगारी सतत वाढत होती. कृष्णप्रकाश यांचा या सर्व गोष्टींशी सामना होणार होता. एका दृष्टीने हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. रूजू झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गुन्हेगारांनी हे शहर आता सोडून जावे, अशा थेट शब्दात गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी अत्यंत कठोर कारवाई करण्यास सुुरुवात केली. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास मर्जीतील पिंपरीेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलालाही गजाआड करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे ‘डॅशिंग’ आणि ’डेअर डेव्हील’अशी त्यांची प्रतिमा पिंपरी चिंचवड शहरात सुुरवातीसच निर्माण झाली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक जाहीर केला. आणि नागरिकांनी त्यांना अडचण भासल्यास या क्रमांकावर थेट आपल्याशी संपर्क साधावा, अनधिकृत धंदे किंवा इतर व्यवसाय जेथे सुरु असतील त्याची माहिती थेट आणपणास द्यावी असेही जाहीर केले. याचा परिणाम त्यांच्याकडे शहरातील गुन्हेगारी जगतात घडणार्या गोष्टींची खडानखडा माहिती जमा होण्यात झाला. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांचे एक विशेष पथक निर्माण केले. हे पथक आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही भागात बेकायदा धंदे अथवा गुन्हेगारी कृत्य सुरु असेल तेथे जाऊन थेट कारवाई करत असे. आणि ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्या हद्दीतील पोलिस ठाण्याकडे सोपवून पुढील कारवाई करण्यास भाग पाडत असे. या स्वतंत्र पथकामुळे प्रत्येेक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनात धडकी भरली होती. या बरोबरच कृष्णप्रकाश यांनी सुरुवातीस वेशांतर करून रात्रीच्यावेळी शहरातील पोलिसठाण्यांना भेटी दिल्या. तिथे कामकाज कसे चालते याची पाहणी केली. गलथान अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई केली. यामुळे एक धडाडीचा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. वेळोवेळी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी ज्या मोहिमा राबविल्या गेल्या त्यातील काही मोहिमांमध्ये कृष्णप्रकाश यांनी स्वत: भाग घेतला. त्यांच्या स्वत:च्या नावे लाच घेण्याचा प्रयत्न करणार्या काही व्यक्तींना गजाआड करण्यासाठी त्यांनी वेशांतर करून ही मोहीम पार पाडली. कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे सतत उघडे असल्यामुळे आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांच्याविषयी वाटत होता.
संगतीने घात केला!
त्यांनी कालांतराने पिंपरी चिंचवड शहर, मावळ परिसरात गुंतागुंतीच्या जमीन व्यवहारांकडे आपला मोर्चा वळवल्यामुळे त्यांचे शहराकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान त्यांच्या कार्यालयात एक बांधकाम व्यावसायिक आणि एक राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी सतत ठाण मांडून बसत असल्याने वेगळी चर्चा सुरु झाली. त्याचा फटका त्यांना बसला. याची थेट माहिती मंत्रालयात पोहोचली. त्यामुळे त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली.
’लेटरबॉम्बने’ आफत
कृष्णप्रकाश यांची बदली होताच त्यांचे वाचक डॉ. अशोक डोंगरे यांनी लिहिले आहे असे भासणारे एक पत्र समाजमाध्यमांवर फिरू लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या त्या पत्रात काय म्हटले आहे हे सर्वप्रथम पाहणे आवश्यक आहे. कृष्णप्रकाश हे शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासाठी जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणी सुमारे 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.
या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, ’विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुखपद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्णप्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्णप्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी कामं करावी लागायची. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होतं. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. त्यापैकी प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्णप्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो असे या पत्रात म्हटले असून शहरातील काही कथित सामाजिक कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची नावेही या पत्रात असून काहींना तर किती लाख रुपये दिले याचाही उल्लेख आहे.
एव्हढेच नव्हे तर हा अर्ज आपण लिहिलाच नाही असे सांगण्यासाठी माझ्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. तो बदलावा असेही धमकावण्यात येऊ शकते असेही या पत्रात म्हटले होते.
कृष्णप्रकाश यांचा खुलासा
हे पत्र सर्वत्र फिरू लागताच डोंगरे यांनी ते आपण लिहिले नसल्याचा खुलासा करत या प्रकरणाची चौकशी करून हे पत्र लिहिणार्या अज्ञात इसमाविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन आताचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना 6 मे रोजी दिले. त्यानंतर रात्री उशीरा कृष्णप्रकाश यांचा खुलासा प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आला. त्यात त्यांनी म्हटले होते की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीसआयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारअर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे.
सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रारअर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापूर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत.
असे कृष्णप्रकाश यांनी खुलाश्यात म्हटले आहे.
काही प्रश्न अनुत्तरित
कृष्णप्रकाश यांच्या या खुलाशातून दोन गोष्टी पुढे येतात एक म्हणजे त्यांनी केलेल्या कायदेशीर कारवाईमुळे दुखावलेल्यांनी त्यांच्याविरोद्ध रचलेला हा कट आहे. आणि, दुसरे म्हणजे कृष्णप्रकाश आता या बाबतीत स्पष्टीकरणे देण्याऐवजी त्यांची बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यावरच भर देणार आहेत. शिवाय अशोक डोंगरे यांनी आपण हे पत्र दिलेच नाही असे म्हटल्यामुळे आता कृष्णप्रकाश यांच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली आहे.
तथापि, काही प्रश्न त्यानंतरही अनुत्तरित राहतात. मुख्यमंत्र्यांना लिहीलेले ते पत्र चार पानी असून त्यात सविस्तर माहिती आहे. ही माहिती खरी की खोटी याची चिकित्सा करणे क्षणभर बाजूस ठेवून विचार केला तर हे लक्षात येते की, एव्हढी सविस्तर माहिती. पोलीसखात्यातील माहितगाराशिवाय अन्य कोणाला असणे शक्य नाही. मग, हे पत्र लिहिणारा पोलीसखात्यातील कोणी आहे की कृष्णप्रकाश यांच्या कारवाईमुळे दुखावलेला एखादा राजकारणी अथवा व्यावसायिक, असा एक प्रश्न निर्माण होतो. काही कथित सामाजिक कार्यकर्त्यांचा या पत्रात उल्लेख असून त्यांच्याबरोबरचे काही कार्यक्रमांमधील कृष्णप्रकाश यांचे अनेक फोटो वेळावेळी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असल्याचे दिसते. तसे असेल तर, त्याचे समर्थन कृष्णप्रकाश कसे करणार असा दुसरा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. याशिवाय काही पत्रकारांची नावेही या पत्रात असून त्यांना दरमहा ठराविक रक्कम दिली जात असे त्याबदल्यात ते आयुक्तांची प्रतिमा माध्यमांमध्ये उंचावण्याचे काम करत असत असेही म्हटले आहे. कृष्णप्रकाश यांना माध्यमांनी उचलून धरले होते. त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत होती हे उघड आहे. काही वेळा त्यांनी वेशांतर करून राबविलेल्या मोहिमा सचित्र आणि चित्रफितींसह प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे अशा मोहिमांवर जाताना ते माध्यमप्रतिनिधींना पूर्वकल्पना देऊन जात असावेत अशीही शंका निर्माण होत आहे.आणि, त्यामुळे त्यांच्या आणि माध्यम प्रतिनिधींच्या निकटच्या संबंधांना पुष्टी मिळते. काही पत्रकार काही प्रकरणात हस्तक्षेप करायचे असेही या पत्रात म्हटले असून पत्रकारांना लाखो रुपये दिल्याचा उल्लेखही पत्रात आहे. त्या बाबतीतही अधिक स्पष्टीकरण केले जाणे आवश्यक आहे.
मालमत्तेचे विवरण चर्चेत
हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर आजवर मूग गिळून बसलेल्या काही माध्यमांना कृष्णप्रकाश यांची बदली झाल्यावर कंठ फुटला आहे. काहींनी त्यांच्या मालमत्तेची यादी प्रसिद्ध केली आहे. ही यांनी त्यांनी सरकारकडे सादर केलेल्या वार्षिक आर्थिक विवरण विषयक प्रतिज्ञापत्रातून घेतली असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. जी माहिती कृष्णप्रकाश यांनी सरकारला दिली आहे त्यात त्यांनी आपली मालमत्ता 99 टक्के वडिलोपार्जित आणि केवळ 1 टक्का आपल्या 24 वर्षांच्या सेवाकाळात आणि काही कर्जातून घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्या मागे या माहितीमुळे काही शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता दिसत नाही.
कृष्णप्रकाश यांनी सरकारकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या यादीकडे लक्ष टाकले असता त्यामध्ये पुढील मालमत्तांचा समावेश असल्याचे दिसून येते.
मूळगावी घर आणि शेकडो एकर जमीन. झारखंड राज्यात सुमारे 133. 29 एकर जमीन कृष्णप्रकाश, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्या नावे आहे. याखेरीज महाराष्ट्रात सांगली, अहमदनगर आणि पुणे येथे भूखंड, सदनिका त्यांच्या मालकीच्या आहेत.
या त्यांच्या मालमत्ता योग्य मार्गाने मिळविलेल्या आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे.
गुन्हा का नोंदवला नाही?
मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र सार्वजनिक झाल्यावर डॉ. अशोक डोंगरे यांनी या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस आयुक्तांना केली आहे. ते स्वत: पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: याप्रकरणी तक्रार नोंदविणे अधिक सयुक्तिक ठरले असते. मात्र, ते टाळून त्यांनी विद्यमान पोलिस आयुक्तांना विनंती केली आहे. त्यामुळे त्यांना केवळ हा अर्ज आपण केलेला नाही एवढेच निदर्शनास आणायचे होते की काय? प्रत्यक्ष या प्रकरणाच्या चौकशीत त्यांना स्वारस्य नाही का? असे प्रश्न या निर्माण?झाले आहेत. कृष्णप्रकाश यांच्या कारकिर्दीवर हे पत्र म्हणजे लागलेला कलंक आहे. तो दूर करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, स्वत: कृष्णप्रकाश आणि डॉ. अशोक डोंगरे यांच्यावर येत आहे.
पावसाळी अधिवेशनात पडसाद
दरम्यान, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्यसरकारला पत्र लिहून कृष्णप्रकाश यांच्याविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत. तर पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कृष्णप्रकाश यांच्याविषयी पत्र दिले असून त्यांनीही चौकशीची मागणी केली आहे. या दोन्ही पत्रामुळे कृष्णप्रकाश यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण यावर दखल घेतली नाही तर येणार्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सनदी अधिकारी यांच्याबाबतीत गैरप्रकार, गैरव्यवहार यांच्या तक्रारी जगजाहीर होऊ लागल्या आहेत. त्यामुळे लोकशाहीत जे महत्वाचे स्तंभ आहेत तेच डगमगू लागले तर लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे राज्यकर्ते, प्रशासक यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण घेतलेल्या शपथेचे पालन करतो की नाही याचे आत्मपरीक्षण करावे.
------------
कृष्णप्रकाश यांनीच लावावा ’लेटर बॉम्ब’चा सोक्षमोक्ष !
Reviewed by ANN news network
on
May 11, 2022
Rating:

No comments: