लेटरबॉम्बमुळे पोलिस आयुक्तालयासह शहरातील पत्रकार जगत हादरले!
पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर मात्र, एका ’लेटरबॉम्बचा’ स्फोट झाला; कृष्णप्रकाश यांचे वाचक म्हणून काम करणारे सहायक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले एक चार पानी पत्र समाजमाध्यमांवर फिरू लागले. या पत्रात अनेक गैरव्यवहारांचा तसेच पत्रकार आणि कथित समाजसेवकांच्या उपद्व्यापांचाही उल्लेख असल्याने पोलीस आयुक्तालयासह, पत्रकार आणि कथित सामाजिक कार्यकर्तेही हादरून गेले होते.
मी पत्र लिहिलेले नाही
मात्र, सहायक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी शुक्रवारी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र आपण लिहिलेले नसून ते बनावट असल्याचा खुलासा करत हे बनावट पत्र तयार करणार्याविरोधात कारवाई व्हावी अशी विनंती त्यात केली आहे.
हे पत्र आपण लिहिले नसल्याचा खुलासा डोंगरे यांनी केला असला तरी आता हे पत्र जगजाहीर झाल्याने आणि त्यातील आरोप गंभीर असल्याने त्यातील आरोपांबाबत सखोल चौकशी पोलिसांना करावीच लागणार आहे. त्याचबरोबर हे पत्र डॉ. डोंगरे यांनी लिहिले नसेल तर ते कोणी लिहिले याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
पत्रात म्हटले आहे ....
या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या त्या पत्रात काय म्हटले आहे ते सर्वप्रथम पाहणे आवश्यक आहे. कृष्णप्रकाश हे शहराचे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासाठी जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणी सुमारे 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.
यामध्ये चार सहायक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही माध्यमांतील प्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांच्या नावाचा समावेशही करण्यात आला आहे. या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुखपद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्णप्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्णप्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची.
पत्रकारांना पैसे देत असल्याचा उल्लेख
मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होत. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्णप्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो असे या पत्रात म्हटले असून शहरातील काही कथित सामाजिक कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची नावेही या पत्रात असून काहींना तर किती लाख रुपये दिले याचाही उल्लेख आहे.
एव्हढेच नव्हे तर हा अर्ज आपण लिहिलाच नाही असे सांगण्यासाठी माझ्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. तो बदलावा असेही धमकावण्यात येऊ शकते असेही या पत्रात म्हटले आहे.
डॉ. अशोक डोंगरे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आपण लिहिलेले नाही. हे पत्र लिहिणार्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती आयुक्तांना केली आहे.
या सर्व प्रकारात काय खरे आणि काय खोटे हे यथावकाश कळेलच. परंतु. शहरात सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरून वावरणारे समाजकंटक आणि पत्रकारितेच्या जोरावर लाखो हडप करून तो मी नव्हेच असे भासवत जगाला तत्वज्ञान शिकविणारे माध्यम प्रतिनिधी मात्र, उघडे पडले आहेत.
दरम्यान पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी नव्या पोलीस आयुक्तांना एक पत्र दिले असून त्यात शहरात स्वच्छ, पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करावा अशी विनंती केली आहे.
-------------
लेटरबॉम्बमुळे पोलिस आयुक्तालयासह शहरातील पत्रकार जगत हादरले!
Reviewed by ANN news network
on
May 07, 2022
Rating:

No comments: