पालिकेतील गैरकारभारावर अंदाजसमिती नाराज!; सविस्तर अहवाल सादर करण्यास आयुक्तांना फर्मावले

पालिकेतील गैरकारभारावर अंदाजसमिती नाराज!; सविस्तर अहवाल सादर करण्यास आयुक्तांना फर्मावले पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत मागील पाच वर्षे भाजप सत्तेत असताना घडलेले गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी राज्याच्या अंदाजसमितीने महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक पुण्यात बोलावली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील तसेच, सर्व विभागप्रमुख, उपायुक्त उपस्थित होते. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर समितीने महापालिकेच्या आयुक्तांसह सर्व अधिकार्‍यांना धारेवर धरत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याचे वृत्त आहे. एव्हढेच नव्हे तर, बैठकीत उपस्थित झालेल्या ज्या मुद्द्यांवर समितीचे समाधान झाले नाही त्यामुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्यास समितीचे प्रमुख आमदार रणजित कांबळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना फर्मावले असल्याचे समजते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिकेत सुरू असलेल्या अनेक गैरव्यवहारांबाबत अनेक नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठविला होता. त्यात विरोधीपक्षासह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचाही समावेश होता. मात्र, नगरसेवकांच्या या तकारींकडे दुर्लक्ष का करण्यात आले असा प्रश्न समितीने पालिका प्रशासनाला विचारला. त्याचे समाधानकारक उत्तर अधिकार्‍यांना देता आले नाही. या बाबत समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकार्‍यांची थातूरमातूर उत्तरे कोरोनाकाळात कडक संचारबंदी असताना महापालिकेने शेकडो भटकी कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे दाखविण्यात आले आहे. या कामी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे काम महापालिकेने कसे केले? असा प्रश्न समितीने विचारला. त्यावर उपायुक्त सचिन ढोले यांनी जो थातूरमातूर खुलासा केला, त्यावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला प्रशिक्षणातील घोळ कडक संचारबंदी असताना महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने शेकडो महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचे महापालिकेने कागदोपत्री दाखविले असून यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे समजते. संचारबंदी असताना एव्हढ्या मोठ्याप्रमाणावर महिलांना एकत्र कसे जमिविण्यात आले? त्यांना प्रशिक्षण कसे देण्यात आले? असे प्रश्न विेचारत अंदाज समितीने या विषयातील गैरव्यवहारावर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. स्पर्श घोटाळाही चर्चेत कोरोनाकाळात कोविड केअर सेंटर्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या सभागृहात याबाबत अनेक नगरसेवकांनी आवाज उठविला होता. या मुद्द्यावरून काही नगरसेवकांनी सभागृहाबाहेरही टीकेची झोड उठविली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतली असल्याचा आरोप सातत्याने होत होता. अंदाज समितीने या मुद्द्यावरही महापालिकेच्या अधिकार्‍यांना अनेक प्रश्न विचारत धारेवर धरले. स्पर्शमध्ये एकही कोरोना रुग्ण दाखल नसताना इतक्या घाईगडबडीत बिल का अदा करण्यात आले? नगसेवकांच्या तक्रारी आल्यावर चौकशीसमिती का नेमण्यात आली नाही?प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग का आली? असे प्रश्न या विषयी अंदाज समितीने विचारले. त्यावर महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. कचराडेपोला वारंवार आग का लागते? काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मोशी येथील कचराडेपोला लागोपाठ आग लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कचराडेपोतील ठेक्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठीच या आगी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने कचर्‍यातून मिथेन हा ज्वलनशील वायू निर्माण होतो. कडक उन्हामुळे तो वायू पेट घेतो; त्यामुळे कचर्‍यास आग लागते असे तकलादू स्पष्टीकरण देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे तोंड बंद केले होते. मात्र, यापूर्वी अशी वारंवार आग का लागत नव्हती? त्यावेळी मिथेन वायू तयार होत नव्हता का? असा प्रतिप्रश्न करण्याचे या पदाधिकार्‍यांना सुचले नव्हते. अंदाजसमितीने या मुद्द्यावर बोट ठेवून अधिकार्‍यांना खुलासा विचारला असता त्यांना तो समाधानकारकरित्या देता आला नसल्याचे समजते. स्मार्टसिटीतील गैरव्यवहाराबद्दलही प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्टसिटी कंपनीतील गैरव्यवहाराबाबत आजवर सर्वसाधारण सभेत अनेकदा अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेतले. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अंदाज समितीने यावर पालिकेच्या अधिकार्‍यांना कारवाई का झाली नाही असा सवाल केला. अर्थातच त्याचे समाधानकारक उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत.निविदेची तांत्रिक तपासणी न करताच कोट्यवधींची कामे कशी देण्यात आली याचा खुलासाही समितीने विचारला. त्यावर स्मार्टसिटीचे अशोक भालकर यांनी जो खुलासा केला त्याने समितीचे समाधान झाले नाही. अहवाल सादर करण्यास फर्मावले एकूण महापालिका प्रशासन अंदाजसमितीच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यास असमर्थ ठरल्याने समितीचेप्रमुख आमदार रणजित कांबळे यांनी या सर्व प्रकरणांविषयी सविस्तर अहवाल समितीला सादर करण्यास आयुक्त राजेश पाटील यांना फर्मावल्याचे वृत्त आहे.
पालिकेतील गैरकारभारावर अंदाजसमिती नाराज!; सविस्तर अहवाल सादर करण्यास आयुक्तांना फर्मावले पालिकेतील गैरकारभारावर अंदाजसमिती नाराज!; सविस्तर अहवाल सादर करण्यास आयुक्तांना फर्मावले Reviewed by ANN news network on May 22, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.