देशात महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला आणि अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. राज्यातील औद्यागिकीकरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे आजपर्यंत परदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रालाच अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे औद्योगिक क्रांतीच्या बाबतीत देशातच नव्हे तर परदेशातही महाराष्ट्राचं नाव आवर्जूृन घेतले जाते. आणि म्हणूनच प्रत्येक परदेशी व्यक्ती महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. त्यातूनच महाराष्ट्राची ही प्रगती झाली आहे. मात्र, राजकारणात द्रष्यानेतृत्वाऐवजी जर निव्वळ राजकारण आणि प्रांतभेद करून आपआपसात वाद निर्माण करून हळूहळू राज्यांतर्गत वाद निर्माण करायचे आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्यायचा ही निती गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने अवलंबिली असून हा धोका भारतीय राज्यव्यवस्थेला असून यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईलच मात्र, देशाची जी पत आज जगभरात आहे ती पत राहणार नाही. आणि यातून आपला देश अधोगतीला जाईल याचे उदाहरण द्यायचे झाले तर आज वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्यामुळे जे राजकीय वातावरण तापले आहे त्या वातावरणातून राज्याला साध्य काय होणार आहे. याचा न विचार करता केवळ राजकीय द्वेषातून आज जी जगजाहिर वक्तव्ये सुरु आहेत त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. एकमेकांवर चिखलफेक करून प्रश्न सुटणार आहेत का? उलट ते अधिक चिघळून एकप्रकारे महाराष्ट्रालाच बदनाम करण्याचा आपण प्रयत्न करीत आहात असे म्हटले तर चुकीचे नाही. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे भाजपची कूटनीती मात्र या संपूर्ण देशासमोर आली आहे. कारण हा प्रकल्प गुजरातमध्ये तेथील वातावरण पोषक आहे याचा अभ्यास न करता केवळ आता इतर महत्वाचे प्रश्नच देशासमोर असताना जनतेचे लक्ष वेधण्यासाठी या प्रकल्पातील राजकारण पुढे आणून भाजपने आपला खरा चेहरा जनतेसमोर आणला.
महाराष्ट्र अनुकुल का?
महाराष्ट्रात सुरू होणारा वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, सेमीकंडक्टर हा शब्द आपण सतत ऐकतोय. परंतु सेमीकंडक्टर म्हणजेकाय त्याचा वापर कुठे व कशासाठी केला जातो? याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडामध्ये नेहमी सेमीकंडक्टर हा शब्द ऐकवयास येत असतो. मात्र, रशिया आणि युक्रेन त्याचबरोबर तायवान येथील युद्धाुमुळे सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांची विक्री मंदावली असल्याने वाहनाच्या किंमतीही वाढल्याचे लक्षात येत आहे. सेमीकंडक्टर हे 20 व्या आणि 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या तांत्रिक प्रगतीपैकी एक आहे. सेमीकंडक्टर हा आयटी उद्योगाचे आधारस्तंभ असल्याचं म्हटलं जातं.
तायवानची कंपनी फॉक्सकॉन आणि मुंबईतील वेदांत कंपनी मिळून गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लाँट उभारणार आहे. हा प्लाँट आधी महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याची चर्चा होती, पण आता हा प्लाँट गुजरातमधील अहमदाबादमध्ये उभारला जाणार आहे. हा करार झाला असून यामुळे जवळपास 1 लाख नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. फॉक्सकॉन प्रकल्प काय? व त्याचे काम कसे चालणारं? त्यामुळे राज्याचा फायदा व किती नुकसान? याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात नेमकं दडलं काय आहे. याचा अभ्यास केल्यानंतर नेमकं पाणी कुठे मुरतय हे समोर येईल.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा योजना होती. कारण महाराष्ट्रातील तळेगावच्या प्रस्तावित जागेवर वीज आणि पाण्याची सुविधा आहे. त्याशिवाय राज्य सरकार अखंडित पुरवठ्याबाबत याची जबाबदारी घेणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून 750 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वीज स्वस्तात उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय प्रस्तावित जागेपासून 10 किमी अंतरात तीन धरणं आहेत.
या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ 50 किमी अंतरात उपलब्ध होणार असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. या भागात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाशी निगडीत नामांकित महाविद्यालये आहेत.
200 किमीच्या परिघात इलेक्ट्रोनिक्स आणि इंडस्ट्रीयल क्लस्टर विकसित आहेत. प्रकल्पातील उत्पादनांसाठी आवश्यक असणारे ग्राहक, उत्पादक उपलब्ध असल्याचे वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकार तळेगाव फेस-4 मध्ये इलेक्ट्ऱॉनिक्स शहर म्हणून विकसित करणार आहे. हे शहर 10 हजार एकर परिसरात असणार आहे. यामध्ये तळेगाव, रांजणगाव, चाकण आणि रायगडजवळ निर्यात हब देखील उभारण्यात येणार आहे.
तळेगावच्या प्रस्तावित जागेपासून मुंबई आणि पुणे असे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. तर, 115 किमी अंतरावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे. 132 किमी अंतरावर मुंबईचे बंदर आहे. 30 किमी अंतरावर पुणे रेल्वे स्थानक, पिंपरी रेल्वे स्थानक 45 किमी अंतरावर आहे. त्याशिवाय, पुणे ते नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याशिवाय तळेगाव हे पुणे, मुंबई आणि नाशिक महामार्गाशी जोडले गेले आहे.
पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे. त्याशिवाय, मेट्रो, हॉटेल्स, रुग्णालयांची उपलब्धता असून वातावरण योग्य आहे. त्याशिवाय, राज्य सरकार तळेगाव इलेक्ट्रॉनिक्स सिटी विकसित करताना या भागात अत्याधुनिक सुविधा असलेले निवासी संकुल उभारणार असल्याचे वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्टाच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहिले आता गुजरातमधील ढोलेराबाबत अहवाल नेमका काय म्हणत आहे याचाही अभ्यास केल्यानंतर काही बाबी समोर येतील.
पायाभूत सुविधांची वानवा
ढोलेरामध्ये गुजरात सरकार 5000 मेगावॅटचा सोलार पार्क उभा करणार आहे. त्याशिवाय टाटा पॉवरकडून 100 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. वीज वितरणासाठी खासगी कंपनीसोबत करार करावा लागणार. हे स्पष्ट होत असतानाच पाणी पुरवठ्याबाबत मात्र, वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कारण नर्मदा कालव्यातून पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण नर्मदा प्रकलपाचे आंदोलन पाहिले आहे. तो प्रकल्प आजही अपूर्णच आहे. या वस्तुस्थितीबरोबर पाण्यातील क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी प्लांटही उभा करावा लागणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणताही मोठा प्रकल्प ज्यावेळी सुरु करतो त्या वेळी त्या जवळपास कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे की नाही हे महत्वाचे असते. मात्र, याठिकाणी याची उपलब्धता दिसत नाही. हे अहवालात स्पष्ट केले आहे.
हा प्रकल्प उभा केल्यानंतर यासाठी लागणारा ग्राहक त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आहेत की नाही याचाही अभ्यास करावा लागतो. मात्र ही परिस्थिती याठिकाणी नगण्य आहे. त्यामुळे प्रकल्प उभा केल्यानंतर या सर्व गोष्टी उभ्या करण्यासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. जमीन नापीक, काही ठिकाणी पाणथळ असून पायाभूत सुविधा आणि काही सिव्हिल कामे करावी लागतील. या ठिकाणी जमीन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावित ठिकाणापासून भावनगर आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहे. ढोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्याशिवाय 200 किमी अंतरावर पिपाव बंदर आहे. हे बंदर कांडला आणि मुंद्रा बंदरापासून जवळ आहे. चार पदरी राज्य महामार्ग असून अहमदाबाद-ढोलेरा दरम्यान सहा पदरी एक्स्प्रेसवे प्रस्तावित आहे. हवामान प्रतिकूल असून नवीन शहर विकसित करण्यात येणार आहे. एकंदरीत या सर्व अहवालातील परिस्थिती पाहिल्यानंतर गुजरातमध्ये हा प्रकल्प राबविताना सर्वच गोष्टी नव्याने उभाराव्या लागणाार आहेत. त्यामुळे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाच्या कंपनीला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हट्टापुढे कंपनी काही बोलू शकणार नाही. कारण या कंपनीचे मूळ संचालक अदानी हे असल्यामुळे अदानी यांना उभे करण्यासाठी या दोनी मोठ्या नेत्यांनी मदत केली आहे शिवाय बँकाकडून वित्तीय मदत देण्याची सुद्धा सोय केली आहे. त्यामुळे कोणी कितीही काहीही केले तरी शेवटी अदानी यांना आता प्रकल्प गुजरातमध्येच करावा लागेल.
1.54 लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लाँट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधत जोरदार टिका केली. वेदांत आणि फॉक्सकॉन या जॉइंट वेंचरचं डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेमिकंटक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात 1000 एकर क्षेत्रात स्थापित केलं जाईल. या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांची भागीदारी 60 आणि 40 टक्के इतकी असेल.
विनाकारण राजकारण नको
राष्ट्रवादी काँग्रेसने शेजारच्या भाजप शासित राज्यावर महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला.
राज्यातील जे जे प्रकल्प बाहेर जात आहेत. त्या प्रकल्पाची माहिती जनतेला देण्यासाठी आपण आलो आहोत, असे शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव येथे जनआक्रोश आंदोलनात बोलताना सांगितले. या आंदोलनातील जनतेची उपस्थिती पाहता जनतेमध्ये रोष, राग दिसत आहे. आपण रोजगाराच्या मागणीसाठी येथे जमलो आहोत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जर वेदांता प्रकल्प आणला असता मात्र आक्रोश मोर्चा ऐवजी जल्लोष मोर्चा झाला असता असे ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
आमचे सरकार येऊन दोनच महिने झाले आहेत. आम्ही वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत तातडीने बैठक घेतली. त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्कातदेखील होतो. कंपनीला अनुदान देण्याचे मान्य केले. मात्र, आमचे सरकार येण्याच्या कितीतरी महिने आधीच हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता. तसे ट्वीटही कंपनीचे अनिल अगरवाल यांनी केले होते, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका करून पलटवार केला.
आपण मुख्यमंत्री होतो त्याकाळात औद्योगिक गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर होता. गुजरातला आम्ही मागे ठेवले, याचा मला आनंदच आहे. गेल्या अडीच वर्षांतील नाकर्तेपणा, घोटाळे आणि नकारात्मकता यामुळे महाराष्ट्र मागे गेला, अशी टीका करताना येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कोणामुळे गेला? नेमकं काय घडलं? या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देऊन राजकारण करू नका युवा पिढीच्या हितासाठी राजकारण करा असा खोचक सल्ला आदित्य ठाकरे यांना दिला.
महाविकास आघाडीच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. आणि हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे असे सांगून त्यांचा समाचार घेतला.
देशात कशाचे राजकारण सुरु आहे याचा अभ्यास केल्यानंतर विकासाच्या ऐवजी र्हासाचे राजकारण सुरु असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मुळातच भाजपचा सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य आता काळाआड झाले आहे. आता फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून जर परदेशी कंपन्यांनी देशातील सुमारे 11 लाख कोटीची गुंतवणूक काढून घेतली तर श्रीलंकेसारखी अवस्था होईल. आज संपूर्ण जगावर आर्थिक संकट असून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळ झाली आहे. केंद्रातील सरकारने सर्व क्षेत्राचे खासगीकरण करून देशातील फायद्यातील कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु केला आहे. लाइफ इन्शूरन्स कंपनीचे काय झाले. त्याचबरोबर अन्य 27 कंपन्या त्यांची अवस्था काय केली. रेल्वे, विमान कंपन्या, त्यांच्या जागा यांची अवस्था काय आहे. भारतातील या परिस्थितीमुळेच परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. भविष्यात देशात गॅसचा तुटवडा भासणार आहे. पेट्रोल, डिझेल याची अवस्था वाईट होणार आहे.
--------------
वेदांत फॉक्सकॉन प्रकरणात राजकारणच अधिक
Reviewed by ANN news network
on
September 28, 2022
Rating:

No comments: