’लेटरबॉम्ब’ प्रकरणाची चौकशी होणार
पिंपरी : पिंपरी चिंचवडचे मागील पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली होताच दि. 21 एप्रिल रोजी समाजमाध्यमांवर फिरू लागलेल्या ’त्या’ पत्रासंदर्भात हे पत्र प्रसारित करणार्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी या प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांना दिले असल्याचे समजते.
कृष्णप्रकाश यांची बदली होताच समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या या 4 पानी पत्राने पोलीस आयुक्तालय, शहरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार जगत यामध्ये एकच खळबळ उडाली होती.
कृष्णप्रकाश यांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी लिहिले आहे असे भासणार्या या पत्रात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आले होते.
मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. त्यापैकी प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्णप्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो असे या पत्रात म्हटले होते.शहरातील काही कथित सामाजिक कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची नावेही या पत्रात असून काहींना तर किती लाख रुपये दिले याचाही उल्लेख आहे. एव्हढेच नव्हे तर हा अर्ज आपण लिहिलाच नाही असे सांगण्यासाठी माझ्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. तो बदलावा असेही धमकावण्यात येऊ शकते असेही या पत्रात म्हटले होते.
हे पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर डॉ. डोंगरेंनी ते आपण लिहिले नसल्याचे निवेदन विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना देऊन हे पत्र लिहिणार्यावर कारवाई करावी अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी स्वत: तकार दाखल करणे टाळले होते. त्यानंतर भूतपूर्व पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही हा आपल्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी आणि त्यानंतर माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
आता पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
--------------
’लेटरबॉम्ब’ प्रकरणाची चौकशी होणार
Reviewed by ANN news network
on
May 14, 2022
Rating:

No comments: