पिंपरी : मागील दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडलेली श्री म्हातोबाची बगाडयात्रा शनिवारी हिंजवडी येथे उत्साहात पार पडली. पयावेळी हिंजवडी, वाकड परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
हिंजवडीचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबाच्या बगाड यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास असून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बगाडयात्रेचेे आयोजन करण्यात येते. यंदा, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खोबरे, भंडार्याची उधळण करत बगाडयात्रा सुरु झाली.
यावेळी, ग्रामस्थांनी पैस.. पैस.. म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला. यंदा गळकरी म्हणून रामदास शिवाजी जांभुळकर यांची निवड करण्यात आली. प्रथेप्रमाणे हिंजवडी गावठाण येथील होळी पायथा मैदानात बगाडाचे मानकरी आणि ग्रामस्थ येतात.जांभुळकरवाड्यातील तरुणाला गळकरी म्हणून निवडतात.
साखरे यांनी गळकर्याला गळ टोचला, संदेश साखरे आणि दीपक साखरे यांना यंदा खांदेकरी होण्याचा मान मिळाला. सायंकाळी पाचच्या सुमारास खांदेकर्यांनी गळकर्याला होळी पायथा मैदानावर आणले आणि बगाडयात्रेला सुरुवात झाली.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड हिंजवडी गावठाण, कस्तुरी चौक, भूमकरवस्ती, केमसेवस्ती, वाकडकरवस्ती, भुजबळवस्तीमार्गे वाकड गावामध्ये दाखल झाले. बगाड मार्गावर जागोजागी ग्रामस्थांच्यावतीने सरबत, थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती. वाकड मधील म्हातोबाच्या मंदिरात बगाड मिरवणुकीची पारंपारिक पद्धतीने सांगता करण्यात आली.
हिंजवडी येथे श्री म्हातोबाची बगाडयात्रा उत्साहात
Reviewed by ANN news network
on
April 18, 2022
Rating:

No comments: