मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर काँग्रेसची निदर्शने

पिंपरी : पिंपरीमध्ये रविवारपासून अंशत: मेट्रोची सेवा सुरु होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या मेट्रो प्रकल्पाचे काम अर्धवट असताना निव्वळ निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन भाजपने श्रेय लाटण्यासाठी उद्घाटनाची घाई केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अवघ्या महाराष्ट्राचा अवमान करणारे वक्तव्य पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे मंत्री, पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत असे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले. रविवारी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यामध्ये मेट्रोचे उद्घाटन केले. त्याचवेळी पिंपरीमध्ये पिंपरी ते फुगेवाडीपर्यंतच्या मेट्रोचे त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी मेट्रो स्टेशनवर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विजय ओव्हाळ, सतिश भोसले, सौरभ शिंदे, किरण खाजेकर, अर्जुन लांडगे, सुधाकर कुंभार, सुभाष भंडारे, रवी यादव, तेजस पाटील, शरद कांबळे, सचिन सोनटक्के, अविनाश कांबळे, अमर पांडे, संतोष नांगरे आदी उपस्थित होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना कदम म्हणाले , पुणे आणि पिंपरीमध्ये मेट्रो सुरु करण्याचे स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचे नियोजन होते. पुढे त्याला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी चालना दिली आणि सुरुवातीला 25 कोटी रुपयांचा निधी दिला. यानंतर पीएमआरडीएच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुरेश कलमाडी यांनी या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा आणि नियोजन केले. पुणे - पिंपरी मेट्रो हे काँग्रेसचे नियोजन आहे. असे असताना निव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजपा त्याचे उद्घाटन करीत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेमध्ये अवमान केला आहे. शेतकरी आणि कामगारांचा अवमान केला आहे. अशा पंतप्रधानांचा तीव्र निषेध शहर काँग्रेसच्या वतीने करीत आहोत असे कैलास कदम म्हणाले. सामाजिक संघटनांनी केला निषेध यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले की, दिल्लीत कृषी कायद्यांचा विरोध करीत असताना आंदोलनात 700 शेतकर्यांीचा मृत्यू झाला. ह्याला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ह्या शेतकर्यां0चे खून पाडले आहेत असें आमचें मत आहे. कोरोनाच्या मुद्यावर पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा देऊन मोदी सत्तेत आले. तर, भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीत आश्वासन दिले होते. परंतु अगदी त्याच्याविरुध्द भाजप आणि त्यांचे पदाधिकारी वागत आहेत. अन्याय, अत्याचार सुरु आहे. याचा सामाजिक संघटनांच्यावतीने निषेध करीत आहोत असेही भापकर म्हणाले.
मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर काँग्रेसची निदर्शने मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर काँग्रेसची निदर्शने Reviewed by ANN news network on March 06, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.