भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील शाहूनगर येथे विकसित केलेल्या अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे उद्घाटन करण्यासाठी रविवारी राज्याचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्यासमोर निदर्शने करण्यासाठी जमा झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे स्फुरण चढलेले दोन्ही बाजुकडील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ महापालिकेने शाहूनगर परिसरात हे उद्यान कोट्यवधी रुपये खर्च करून उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौर्या वर होते. त्याच कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोचे त्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करून आणि शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून शहर भाजपने येत्या निवडणुकीसाठी आपल्याला अनुकुल वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालविला होता. मात्र,मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली होती. माजी महापौर मंगला कदम यांनी वाजपेयी उद्यानाचे काम निकृष्ट आणि अपुरे असल्याचा आरोप केला होता. त्याला माजी सभागृहनेता एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले होते. या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापत असताना रविवारी सकाळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी मेट्रोस्थानकावर जाऊन मोदींविरोधात घोषणाबाजी करत मेट्रोला काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन केले. दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाजपेयी उद्यानाचे उद्घाटन होते त्याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी जमा झाले. विरोधक निषेध करणार याचा अंदाज आल्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात जमले. फडणवीस त्या ठिकाणी येताच दोन्ही गटांकडून परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू झाली. ’चोर है, चोर है. बीजेपी चोर है’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. परिणामी तणाव वाढला आणि शब्दाशब्दी होऊन दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीमार करावा लागला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधीपक्ष नेता राजू मिसाळ, नगरसेवक मयूर कलाटे, मंगला कदम यांच्यासह अन्य आजी माजी नगसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, केएसबी चौकात आण्णासाहेब पाटील स्मारकाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार होते.त्यापूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार Reviewed by ANN news network on March 06, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.