विजय भोसले
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या घरातील बांधकामांवर राजकीय सूडापोटी हेतुपुरस्पर कारवाई केली जात आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी विधानपरिषदेत अंतीम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बेकायदा बांधकामांना थारा देणार नाही, अशी घोषणा केली होती. तथापि, भाजपच्या काही नेत्यांच्या मुंबईतील घरांवर कारवाई करताना शिवसेनेकडून बहुतांश बेकायदा बांधकामांना अभय दिले जात आहे, बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना दुजाभाव करण्यात येत आहे. असाही आरोप दरेकर यांनी केला.
तसेच जुन्या इमारतींच्या दुरुस्तीच्या नावाखाली घरदुरुस्ती मंडळाच्या परवानगीपेक्षा जास्त मजल्यांचे बांधकाम, जादा चटईक्षेत्राचे बांधकाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने आपल्या वचननाम्यातील २५ टक्के आश्वासने पूर्ण केली नाहीत. २००९ ते २०२१ या १२ वर्षांच्या काळात मुंबई महापालिकेने तीन लाख ५२ हजार ९९० कोटी रु. खर्च केले. तर २०१७ पासून २०२१पर्यंत पाच वर्षात एक लाख ५३ हजार ५८४ कोटी रु. खर्च केले. हे कोट्यवधी रुपये कुणाच्या खिशात गेले असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा पाढा दरेकर यांनी विधानपरिषदेत वाचून दाखवला. महाविकास आघाडी खासकरुन मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मुंबई व ठाण्यातील महापालिकेच्या माध्यमातून जनतेला फसविले आणि सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केला असा गंभीर आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत २०१७ साली दिलेल्या वचननाम्यातील एकही वचन पूर्ण करू शकलेली नाही हे मुंबईकरांचे दुर्दैव आहे. ५०० ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची मागणी सतत होते. पण त्याचा विचार होत नाही. मुंबईतील मैदानांची आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात घालण्यात येत आहेत असा आरोपही दरेकर यांनी केला.
भाजप नेत्यांच्या घरावर सूडापोटी कारवाई; बेकायदा बांधकामांना मात्र अभय! प्रवीण दरेकर यांचा घणाघात
Reviewed by ANN news network
on
March 25, 2022
Rating:

No comments: