राष्ट्रवादीच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

पिंपरी चिंचवड महापालिकेतील गेल्या 5 वर्षातील भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट आणि गैरकारभार अवघ्या शहरवासियांनी पाहिला आहे. पिंपरी चिंचवड शहरात भाजपची ताकद कमी असली तरी आजपर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा भाजपने नेहमीच 5 ते 7 हजार मते अधिक घेतल्याचे अनेक निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा या मतदारसंघात भाजपचेच प्राबल्य सातत्याने राहिले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने 77 जागा जिंकून प्रथमच महापालिकेची सत्ता काबिज केली. याचा अर्थ भाजपचे मोठे काम आहे असे नाही तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या मोठी होती. आणि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपने 27 लाख रुपयांच्या मूर्तीघोटाळ्याचे प्रकरण एव्हढे गाजविले की राष्ट्रवादी या आरोपांना उत्तर देऊ शकली नाही. आणि हाच प्रचाराचा मुद्दा बनल्याने राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागली. तर दुसर्‍या बाजूला आपण शहराचा विकास मोठ्याप्रमाणात केला असल्याने आपल्याला पैसा खर्च करण्याची गरज नाही हा फाजिल आत्मविश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नडला. कारण या निवडणुकीत त्यांनी निवडणूक खर्च करायचा नाही हा निर्णय घेतला. आणि त्यातच स्थानिक नेत्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांना मदत करा असा सल्ला दिला. मात्र, या स्थानिक नेत्यांनी पैसे खर्च केलेच नाहीत. उलट भाजपने मोठ्याप्रमाणात खर्च करून 77 उमेदवार निवडून आणले. आणि सत्तापालट होऊन राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या एकाधिकारशाहीला अखेर सुरूंग लागला. पिंपरीची सत्ता मिळेल असे भाजपच्या नेत्यांना स्वप्नातदेखील वाटत नव्हते. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे या 2 नेत्यांनी सत्ता खेचून आणून भाजपचे कमळ फुलविले. भाजपची सत्ता आल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात, समाजकारणात आणि भ्रष्ट कारभारात फरक पडेल असे जनतेला वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. उलट या 5 वर्षात भ्रष्ट कारभाराने कळस गाठला. आणि स्थायीसमितीने तर टक्केवारीची भाषाच बदलली. जीे पूर्वी 2 ते अडीचटक्क्यांवर स्थायीसमितीमध्ये देवाणघेवाण सुरू होती. तीच भाजपने ही टक्केवारी 8 ते 10 टक्क्यांवर नेऊन ठेवली. आणि गेल्या 5 वर्षात स्थायीसमिती सभापतींनी 80 ते 100 कोटीपर्यंत वरकमाई केल्याची चर्चा खुलेआम होत आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतील सव्वा सहा कोटींचा भ्रष्टाचार, कोविडच्या खरेदीत झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार, स्पर्श प्रकरण, शिक्षक भरतीमधील भ्रष्टाचार, पर्यावरण विभागातील निविदा प्रक्रियेत कोट्यवधींची अनागोंदी आदी प्रकार गाजले आहेत. मात्र, राष्ट्रवादी डोळ्यावर कातडे ओढून 5 वर्षे झोपली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा खांदेपालट झाला. नगरसेवक अजित गव्हाणे अध्यक्ष झाले. 15 दिवसात त्यांनी 3 ते 4 आंदोलने घेऊन कुंभकर्णावस्थेत असलेली राष्ट्रवादी जागी केली. मात्र, मुख्य मुद्द्यांवर राष्ट्रवादी आक्रमक होणार का? कारण आजही भाजप- राष्ट्रवादीचे अंतर्गत हितसंबंध, नातीगोती यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची नुराकुस्ती होऊ नये. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये क्रमांक 1 राष्ट्रवादी, क्रमांक 2 काँग्रेस, क्रमांक 3 भाजप आणि क्रमांक 4 शिवसेना यांनी सर्वाधिक जागा जिंकून या तिन्ही पक्षांनी राज्यात क्रमांक 1 वर असल्याचे दाखवून दिले. तर, राष्ट्रवादीने मोठी मुसंडी मारत महाआघाडीत धूर्त राजकीय डावपेच करीत सर्वाधिक जागा मिळविल्या. यामध्ये अजितदादांचे राजकीय कौशल्य म्हणावे लागेल. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे नाही. कारण निधी वाटपात अजितदादांनी सातत्याने काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न केला. यावर मंत्री अशोक चव्हाण, नितीन राऊत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाज उठवून आघाडीधर्म पाळावा याची आठवण करून दिली. एव्हढेच नव्हे तर मालेगाव येथील नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना त्याठिकाणी सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत आणले. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील एका नगरपालिकेतील सर्वच्यासर्व नगरसेवक काँग्रेसमध्ये आणले. त्यावेळी नाना पटोले यांनी आम्ही हे करू शकतो त्यामुळे आघाडी धर्म पाळावा ही आमची अपेक्षा आहे हे दाखवून दिले. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल दुमत नाही. मात्र, त्या त्या पक्षाची सत्ता असताना तो पक्षच उध्वस्त करून सोयीचे राजकारण करणे हे महाविकास आघाडीला परवडणारे नाही. कारण महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या हातून गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकर विभागामार्फत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मागे ससेमिरा लावून माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यामार्फत जो एककलमी कार्यक्रम सुरू ठेवून महाविकास आघाडी सरकार अस्थिर कसे होईल यासाठी जो खटाटोप सुरू आहे. तो परवडणारा नाही.त्यामुळे अजितदादांनी तोडफोडीचे राजकारण बंद करून महाविकास आघाडी भाजपला योग्यरित्या प्रत्युत्तर कसे देऊ शकेल यासाठी सामुदायिक प्रयत्न करावा. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. अशीही उपकारांची परतफेड! राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या ठराविक पदाधिकार्‍यांना आर्थिकदृष्ट्या एव्हढे मोठे केले की आज ते शरद पवार असो की अजितदादा असो त्यांना विचारतच नाहीत. परस्पर निर्णय घेऊन अनेकवेळा साहेबांना आणि दादांनादेखील फसविले आहे. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी सायकलवर, स्कुटरवर फिरत होते. ते आज 2 ते 5 हजार कोटींचे मालक झाले आहेत. महापालिकेत ठेकेदारी मिळवून अनेक कामात भागीदारी केली. त्यामुळे पैसा भरपूर मिळाला. मात्र, ज्या पवारसाहेबांनी व दादांनी आपणास मोठे केले त्यांनाच गेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत दगा देऊन सत्ता घालविली.एव्हढेच काय वयाची 82 वर्षे असताना पवारसाहेबांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढून 53 आमदार निवडून आणले. आणि यांनी हीतसंबंध ठेवून गेली 5 वर्षे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसून ठेके घेऊन कोट्यवधी रुपये कमविले. मात्र, याची साधी लाजही त्या मंडळींना वाटत नाही यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणती आहे. अजितदादांनी तर महापौर, स्थायीसमिती अध्यक्ष, पक्षनेते, विरोधीपक्ष नेते अशी पदे एकालाच देऊन मोठे केले. त्या दादांना देखील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. याचा सल दादांच्या मनात कायम आहे. आणि म्हणूनच त्यांनी पालिकेकडे काहीकाळ दुर्लक्ष केले. शिवाय, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. म्हणूनच त्यांनी पालिकेतील गैरकारभाराकडे कानाडोळा केला असावा. मात्र, आता राज्यात फडणवीस आणि महाविकास आघाडी यांच्यातील कलगीतुरा पाहिल्यानंतर दादांनी देखील गप्प बसून चालणार नाही. ज्याप्रमाणे शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजपला अंगावर घेऊन जशासतसे उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याप्रमाणेच दादानींही आता अधिक आक्रमक होऊन मी पुन्हा येईन असे स्वप्न पाहणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. घरभेद्यांमुळेच राष्ट्रवादीची वाताहत गेल्या 6 वर्षात राष्ट्रवादीची धुरा संजोग वाघेरे यांनी सांभाळली. त्या कारकिर्दीत राष्ट्रवादीतील हे महाभाग घरामध्ये बसले होते. त्यावेळी त्यांना पक्षाबद्दल प्रेम वाटत नव्हते. मात्र, खुद्द शरद पवार यांनी पिंपरी शहरात 2 दिवस तळ ठोकून जुन्यानव्यांची मोट बांधून बैठका घेतल्या. आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यानंतर शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला. माजी आमदार विलास लांडे हे शहराध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी गेले 4 ते 5 महिने व्यूहरचना आखली होती. मात्र, त्यांना हुलकावणी बसली. कारण 2 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी असे अजितदादांचे मत होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. शिवाय 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर बराच काळ ते विजनवासात होते. त्यामुळे तो ही राग दादांना होता. आणि यासर्वाचा विचार करून अजित गव्हाणे यांचे नाव निश्चित केले. गव्हाणे यांचा शांत आणि मितभाषी स्वभाव आहे. कोरीपाटी असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे शक्य नाही. मात्र, नातेगोते आणि स्थानिक संबंध यावरून ते आमदार लांडगे यांच्यावर थेट आरोप करणार का हा देखील प्रश्न आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवारसाहेबांची या नव्या पदाधिकार्‍यांनी पुण्यात भेट घेतली त्यावेळी एक दिलाने काम करा असा कानमंत्र त्यांनी दिला. कारण गेल्यावेळेस एकदिल नसल्यामुळेच राष्ट्रवादीची वाताहत झाली हेच यातून साहेबांना सांगायचे आहे. पिंपरीत दादांचाच सल्ला राष्ट्रवादीचीे संवादयात्रा नुकतीच शहरात येऊन गेली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पक्षातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता बोलला पाहिजे यासाठी ही संवाद यात्रा सुरू केली आहे. नव्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांची कार्यकारिणी मोठी असली पाहिजे. पक्ष चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे. बूथकमिटीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. प्रसंगी लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवायला हवी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या शहराचा कोपरा न कोपरा माहिती आहे. या शहरातील जनतेला विश्वास आहे की, अजितदादा या शहराला निधी देऊन न्याय देतील. त्यामुळे लोक पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्ता देतील. प्रदेशाध्यक्षांना हे सांगण्याची वेळ का आली? कारण, सतत सत्तेत राहिल्यामुळे प्रत्येकाच्या अंगी मस्तवालपणा येतो. पक्षसंघटना काय असते हे माहीत नसते. कार्यकर्त्यांना कसे सांभाळले पाहिजे याचीही जाण नसते. प्रत्येक निवडणुका आल्या कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचे आणि नंतर फेकून द्यायचे हेच आजपर्यंतचे धोरण असल्यामुळे कार्यकर्त्यांना आता भाड्याने आणावे लागते. शिवाय, शासकीय समित्या वर्षानुवर्षे होत नाहीत. शेवटचे 6 महिने राहिले की कार्यकर्त्यांच्या नेमणुका करायच्या आणि बोळवण करायची ही राजकारणातील फॅशन झाली आहे. तर, हल्लीच्या काळात पैशाचा वापर करूनच निवडणुका जिंकायच्या ही प्रथा रूढ झाल्यामुळे कार्यककर्त्यांचे अस्तित्व संपले आहे. किमान जयंत पाटलांनी याची जाणीव करून कार्यकर्त्यांचे महत्व काय असते हे त्यांनी सांगितले. मात्र, ते केवळ निवडणुकीपुरते राहू नये. तर पिंपरी चिंचवडमध्ये दादांचाच अंतीम निर्णय असेल. या ठिकाणी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. केवळ शिष्टाचार म्हणून पिंपरीत येऊन आढावा घेतला. एकंदरीत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एप्रिलअखेर अथवा मे च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. पिंपरीतले चाणक्य समजले जाणारे सारंग कामतेकर यांनी प्रभागरचना केल्याची चर्चा आहे. प्रभागरचना करताना काही ठिकाणी बरोबर राजकीय डाव साधून नातीगोती समोरासमोर येतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा वाद आणि पक्षीय बदल होण्याची मोठी शक्यता आहे. गेल्यावेळेस आमदार जगताप यांच्यासमवेत राहून प्रभागरचना केली होती. आता राष्ट्रवादीबरोबर आल्यामुळे राष्ट्रवादी वाढणार की बुडणार हा येणारा काळच ठरवेल. शहराध्यक्ष गव्हाणे यांनी बेरजेचे राजकारण सर्वांना बरोबर घेऊन करावे चुकीच्या सल्ल्याला बळी पडलात तर भावी राजकीय अस्तित्वाला धक्का बसेल याची नोंद घ्यावी.
राष्ट्रवादीच्या राजकीय अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादीच्या राजकीय अस्तित्वाची लढाई Reviewed by ANN news network on March 02, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.