पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून दोन-चार आंदोलने वगळता राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सुस्त का आहे? हे समजत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार देखील गप्प असल्यामुळे त्यांना पिंपरी- चिंचवडची सत्ता नको आहे की काय? अशी शंका पिंपरी- चिंचवड शहरातील राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे. भाजपला स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे ते कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता वाढदिवस, नगरसेवकांचे वाढदिवस यानिमित्ताने जनसंपर्क, विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शहरात वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, वरिष्ठ नेत्यांचे आदेश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे दादांची परवानगी अथवा त्यांच्या कानावर घातल्याशिवाय येथील कोणतेही पान हललणार नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांचीही पंचाईत झाली आहे. तर शिवसेनेही आता निवडणुकीच्या तोंडावर स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला असून भाजपला टार्गेट करण्यात आले आहे. तर ज्या काँग्रेस पक्षाला जमेत धरले जात नव्हते त्या काँग्रेस पक्षामध्ये शहराध्यक्ष कैलास कदम यांनी शहरात काना-कोपर्यात सभा घेऊन संपर्क यात्रा सुरू केली आहे. उशिरा का होईना या नेत्यांना जाग आल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. तर रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पीपल्स (कवाडे गट) आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध प्रश्नावर आंदोलने सुरू करून निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले. एकंदरीत फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाचा खरा विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूकीत कोणती व्युवरचना वापरणार शिवाय कार्यकर्त्यांमध्ये देखील धाकधाक राहणार. कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढवायची. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आता स्वतः हून पुढाकार घेऊन निवडणुकीसंदर्भात बैठका, सभा घेऊन काम सुरू केले तर कार्यकर्त्यांमध्ये जागृता निर्माण होईल. अन्यथा यंदाच्या वेळीही सत्तेपासून लांब राहावे लागले तर भविष्यात राष्ट्रवादीची काय अवस्था होईल, याचा विचार करण्याची गरज आहे.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी- चिंचवड शहरावर अधिराज्य गाजविले त्या राष्ष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था पाहिल्यानंतर अनेकांचा विश्वास बसणार नाही. की आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या दोन स्थानिक नेत्यांनी अजितदादा सारख्या कामाने झपाटलेल्या नेत्याच्या हातून सत्ता खेचून आणली. याला अनेक कारणे आहेत. कारण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना कायम सत्तेत राहण्याची सवय लागल्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन कोण करणार? मात्र, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत दिवसेंदिवस बदलत चालल्यामुळे पुर्वीचे समाजकारण राहिले नाही. आणि पुर्वीसारखे भेळीवर काम करणारे निवडणुकीतील कार्यकर्ते राहिले नाहीत. राजकारण हे देखील आता धंद्देवाईक झाल्यामुळे कार्यकर्ते निवडणुकीपुरते काय मिळते ते पाहत राहतात. आणि नगरसेवक झाल्यानंतर गेलेला पैसा परत कसा आणि अधिक कसा मिळेल, हे राजकारणात नवीन पध्दत रुढ झाल्यामुळे कार्यकर्ते ही मुळ संकल्पना राजकारणातून लुप्त होउ लागली आहे. त्यामुळेच राजकारणात बाजारीकरण वाढल्यामुळे पुर्वी दोन-चार नगरसेवक महापालिकेत ठेकेदारी करायचे. मात्र, भाजपच्या कारर्कीदीत देशभर, राज्यभर, पदाधिकारीच ठेकेदार झाल्यामुळे कार्यकर्ताही आता संपत चालला आहे. त्याला पिंपरी-चिंचवड अपवाद नाही. त्यामुळे येणार्या काळात कोणत्याही निवडणुका सामाजिक चळवळी अथवा व्यक्तीच्या कामावर होणार नसून साम,दाम, दंड, भेद या नितीवरच राहतील. यावर तिळमात्र शंका नाही. आज पिंपरी- चिंचवड शहराचा जो विकास दिसत आहे. तो विकास कै. अण्णासाहेब मगर, कै. प्रा. रामकृष्ण मोरे आणि अजितदादा यांच्या कतुर्त्वामुळेच पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक अवघ्या जगभर पसरला आहे. अनेक मोठे प्रकल्प, जेएनएनयुआरएम यासारखे प्रकल्प व त्यासाठी लागणारा केंद्र सरकारकडून निधी मोठ्या प्रमाणात मिळाला. तो केवळ शरद पवार यांच्या प्रयत्नातूनच. त्यामुळे या सर्व नेत्यांच्या योगदानामुळेच पिंपरी- चिंचवड शहराला ’मिनि इंडिया’ म्हणून ओळख निर्माण झाली.
आत्मचिंतन नाहीच...!
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी- चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलला. हे तितकेच खरे आहे. मात्र, 2017 मधील झालेला महापालिका, त्याचबरोबर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव देखील याचे आत्मचिंतन कधीच केले नाही. कारण, राष्ट्रवादीने आजपर्यंत एकाच व्यक्तीला अनेक पदे देऊन मोठे केले. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्ता याला ताकद देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मुठभर लोक मोठी झाली. कार्यकर्ता मात्र जाग्यावरच राहिला. आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांना पवारसाहेब आणि अजितदादा यांनी मोठे केले. हे मान्य करावे लागेल. मात्र, जगताप आणि लांडगे यांनी सत्तेच्या माध्यमातून आप-आपल्या कार्यकर्त्यांना महापालिकेतील ठेके मिळवून स्वतःच्या पायावर उभे केले. एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकीत स्वतःची ताकद उभी करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये आणून पदेही दिली. आणि यातूनच स्थानिक नेतृत्व तयार झाले. यापुर्वी सत्त्तेच्या चाव्या या पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि बारामती येथे होत्या. त्यांनी मोठे केले. असे नाही. ज्यांना मोठे केले, तेच आज इथले सत्ताधीश झाले. तेच जर अजितदादांनी आपले वर्चस्व ठेवून स्थानिक नेत्यांमधील एखादा अभ्यासू सामाजिक जाण असलेला नेत्याच्या हातात येथील नेतृत्व दिले असते तर आज ही वेळ आली नसती. आणि मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थला पराभवास सामोरे जावे लागले नसते. त्यामुळे किमान यापुढे देखील या सर्व मागील अनुभवाचा विचार करता नव्याने काही समीकरणे आणून विस्कटलेली घडी निट करता येईल का?यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळू शकते.
अंतर्गत वाद शिवसेनेला शाप
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. तर पिंपरी- चिंचवड शहरात म्हणजेच मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, महापालिकेत केवळ 9 नगरसेवक आहेत. याचे कारण शोधले असता शिवसेनेत अंतर्गत वाद असल्यामुळे पक्ष संघटना वाढलीच नाही. त्यामुळे प्रत्येक महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ही अवस्था आहे. गजानन बाबर दोन वेळा आमदार, एक वेळा खासदार होते. त्यांच्या काळातही अशीच अवस्था होती. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हा शाप आहे की काय? असे कोणाला वाटत असेल तर तशी वस्तुस्थिती नाही. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यांना आजपर्यंत स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्ता कधीच वाढवून दिला नाही. कित्येक कडवे शिवसैनिक आहेत, ते निवडून येऊ शकतात. अशांना मात्र कधी तिकीट दिले तर कधी तिकीट दिले नाही. तर त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना मदतही केली नाही. व काही जणांनी आयुष्यभर शिवसैनिक म्हणून काम केले. त्यामुळे शिवसेना वाढणार कशी? आतापर्यंत जे-जे संपर्कनेते नेमले त्या संपर्क नेत्यांना कार्यकर्त्यांपर्यत जावू दिले नाही. त्यामुळे नावाला हे संपर्क नेते होते. त्यामुळे शिवसेना पिंपरी- चिंचवडमध्ये वाढली असती मात्र, अंतर्गत मतभेदामुळे शिवसेना ही महापालिकेत नावापुरती उरली. शिवसेेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहेर आहेत. त्यांना पिंपरी- चिंचवडच्या स्थानिक राजकारणाची पुर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी येथील स्थानिक नेत्यांमधील मतभेद, गटबाजी याची माहिती घेऊन काही नव्याने निर्णय घेतल्यास संख्याबळ वाढू शकते. अन्यथा काही फरक पडणार नाही. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना देखील पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये शिवसेना वाढावी, हे मनापासून वाटत असले तरी आतापर्यंत जेवढे संपर्कप्रमुख झाले त्यांनी येथील स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांची व्यथा काय आहे? हे कधीच जाणून घेतले नाही. आणि कायम अंतर्गत मतभेद ठेवल्यामुळे शिवसेना वाढू शकली नाही. हे प्रमुख कारण आहे. बारणे यांचे कट्टर समर्थक गजानन चिंचवडे यांनी भाजपची वाट धरली. त्यांच्या पत्नी अश्विनी या नगरसेविका आहेत. त्यांचीही पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे तीही आता जागा कमी होणार. भविष्यात बारणे देखील शिवसेनेत राहतील की नाही? हे येणारा काळच ठरवेल. बारणे यांनी घाटा खालच्या भागात लक्ष घातले आहे. तितके लक्ष चिंचवड विधानसभा मतदार संघात घातले नाही. याचेकारण, अंतर्गत वाद हेच प्रमुख कारण असून शिवसेना अंतर्गत वादामध्ये पछाडलेली आहे.
काँग्रेस खाते उघडेल
पिंपरी- चिंचवड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या बालेकिल्यात आज एकही काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. यासारखे दुसरे दुर्देव नाही. कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी- चिंचवड महापालिकेची विकासाची गाडी सुरू झाली. मोरे यांचा अभ्यास दुरदृष्टी यामुळे यशवंतराव चव्हाण रूग्णालय, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी अनेक योजना राबविल्या. आजही आवर्जुन त्यांचे नाव घेतले जाते. अजितदादांच्या पिंपरी- चिंचवड पर्दापणामुळे त्यांनी कुशलतेने शहरावर छाप बसवून अवघे समाजवादी काँग्रेस असलेले दहा नगरसेवकांवरून 65 ते 70 नगरसेवकांपर्यंत मजल मारली. एवढेच नव्हे तर शहराला विकासही झपाट्याने केला. हे करत असताना त्यांनी काँग्रेस मात्र संपवली. हे केवळ स्वर्गीय मोरे यांना सत्ता हवी असल्यामुळे साध्य करता आले. कालांतराने काँग्रेसच्या नेतृत्वासाठी सुरेश कलमाडी, हर्षवर्धन पाटील आदींनी लक्ष घातले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी भाऊसाहेब भोईर यांना दादांनी हाताशी धरून उरली-सुरली काँग्रेसही संपविली. त्यानंतर सचिन साठे सारख्या तरूण कार्यकर्त्याच्या हातात काँग्रेसची सत्ता आली. मात्र, अंतर्गत वाद यामुळे 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यासारखे दुसरे दुर्देव काय? 2017 च्या निवडणुकीत कैलास कदम यांनी ऐन निवडणुकीत काही चुकांमुळे येणार्या दोन जागा गमवाव्या लागल्या. ’ठीक आहे, देर है दुरूस्त है. त्यांना शहर काँग्रेस अध्यक्षपद मिळाले. आणि त्यानंतर त्यांनी पक्षसंघटना आणि बैठका घेण्याचे, सभा घेण्याचे जे सत्र सुरू केले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, यापुर्वी पाच वर्ष आपण निद्रावस्थेत होता. तेच जर त्यावेळी पक्षसंघटना जागृत ठेवली असती. तर आज चांगली परिस्थिती असती. कारण, या शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे. मात्र, त्यांना योग्य नेतृत्व आणि आपले म्हणणारा कोणी नसल्यामुळे काँग्रेसचा मतदार बाजूला गेला आहे. त्यांना जवळ करणारे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसची दुरावस्था झाली. झाले गेले विसरून जुन्या-नव्यांची मोट बांधून पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच यावेळी महापालिकेत काँग्रेसचे सदस्य दिसतील. हे निश्चित.
भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा महिन्यापासूनच वॉर्डा-वॉर्डात बैठका घेऊन नियोजन केले आहे. आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात सहा महिन्यापासूनच बैठका घेऊन कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. शिवाय सामाजिक उपक्रमाबरोबर आरोग्य उपक्रमावर भर देऊन जनसामान्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर आमदार लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपमय वातावरण केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ रंगली पैठणीचा, विविध स्पर्धा, रिव्हर सायलोथॉन, एसटी कर्मचार्यांना अन्नधान्य वाटप आदी कार्यक्रमाव्दारे महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केल्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात अन्य पक्ष आहे की नाही? असे वातावरण दिसत आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात 90 टक्के बाहेरचा वर्ग आहे. तरी देखील आज स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व आहे. कारण, आजही गावचा आणि बाहेरचा निवडणुकीत वाद केला जातो. निवडणुकीत स्थानिक मंडळी कोणत्याही पक्षातून लढले तरी शेवटी निवडणुक झाल्यानंतर स्थानिक नेत्यांकडेच सत्त्ता असते. त्यामुळे या मंडळींना काही फरक पडत नाही. खासदार श्रीरंग बारणे, आमदार जगताप, आमदार लांडगे, माजी आमदार विलास लांडे या नेत्यांना बाहेरच्या मंडळींचाच मोठा पाठिंबा असल्यामुळे ते निवडून आले आहेत. त्यांनी आपली वेगळी छाप बसविली असून निवडणुकीत बाहेरच्या मंडळींचा मोठा पाठिंबा असल्यामुळे सत्ता कायम राहिली आहे. अजितदादांना कोणाला किती मोठे करायचे याचे गमक न समजल्यामुळे आज राष्ट्रवादीची ही अवस्था झाली आहे. पार्थला जर या निवडणुकीत नेतृत्व करायचे असेल तर दादांनी पार्थला काही प्रमुख नेत्यांसमवेत नेतृत्वाची संधी दिली पाहिजे. त्यामुळे तळागळापर्यंत पोहचता येईल. सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी प्रभाग रचनेबद्दल उच्च न्यायालयात हरकत घेतली आहे. त्यांची मागणी मान्य झाली तर निवडणुका दोन ते तीन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीला पक्षीयदृष्टट्या हालचाल करण्यास वेळ मिळेल. मात्र, या जर तरच्या बाबी आहेत. एकंदरीत कोणता पक्ष अथवा व्यक्तींवर टीका करण्याचा दै. केसरीचा उद्देश नाही. राजकीय आणि सामाजिक वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
------------------
पिंपरीची सत्ता अजितदादांना नको आहे की काय?
Reviewed by ANN news network
on
November 24, 2021
Rating:
No comments: