पिंपरी : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी प्रस्तावित तीनही काळे कायदे मागे घेतले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली हे देशभरातील नागरिकांच्या एकजुटीचे यश आहे. आता कामगारांविरोधी केलेले प्रस्तावित चार कायदे रद्द करुन आता देशभर जुन्याच कामगार कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी लढा उभारुया असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केले.
यावेळी मानव कांबळे, मारुती भापकर,नरेंद्र बनसोडे, प्रताप गुरव, ामला सोनवणे, लता भिसे, उमेश खंदारे, धम्मराज साळवे तसेच हिराचंद जाधव, आबा खराडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विशाल जाधव, के. हरी नारायनन, दिलीप पवार, किशोर ढोकले, निरज कडू, काशीनाथ नखाते, छाया देसले, विश्वास जगताप, झेवियर ॲथोंनी आदी उपस्थित होते. यावेळी कदम म्हणाले की, मागील अकरा महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सकाळी नऊ वाजता जाहिर केले की, तीनही प्रस्तावित शेतकरी कायदे मागे घेत आहोत. या महिन्यात होणा-या संसदीय अधिवेशनात याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात येतील. हे यश म्हणजे मागील अकरा महिन्यांपासून देशभर शेतकरी आणि कामगारांनी या कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचे यश आहे. देशातील बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेससह इतर मित्र पक्षांनी आणि इंटकसह इतर कामगार संघटनांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन विविध प्रकारे आंदोलने केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखिल कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे रास्ता रोको आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला होता. विविध आंदोलने शहरात करण्यात आले होती. यासाठी भाजपा शिवाय इतर सर्व पक्षांच्या खासदार, आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी आंदोलने करुन त्यात सहभाग घेतला होता या यशाविषयी या सर्वांचे आभार कदम यांनी मानले.
कॉंग्रेस, शेतकरी संघटना, कामगार संघटना आणि समविचारी पक्ष व संघटनांनी केला आनंदोत्सव
Reviewed by ANN news network
on
November 19, 2021
Rating:

No comments: