शिवसेना आणि बंडखोर यांच्यातील संघर्षाचे सभागृहात पडसाद!
शिवसेना फुटल्यानंतर राज्यभरात मूळ शिवसेना कोणाची यावर वाद सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हा वाद सुरू असून त्याचे पडसाद आता सभागृहात देखील उमटू लागले आहेत. पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गेल्या बुधवारी झाली. पहिल्या आठवड्यात दोन दिवस कामकाज झाले. मात्र; गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ झाला. या गोंधळामध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि उपसभापती नीलम गोर्हे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गुलाबराव पाटील यांनी मध्येच बोलायला सुरुवात केल्यामुळे संतप्त झालेल्या उपसभापती गोरे यांनी मंत्रिमहोदयांना; सभागृहात वागण्याची तुमची ही पद्धत कोणती आहे? तुम्ही चौकात उभे आहात का? असे खडसावून विचारले. त्यानंतरही पाटील बोलतच राहिल्यामुळे संतप्त झालेल्या उपसभापती गोरे यांनी तुम्ही मंत्री असाल तर घरी.. अशा शब्दात पाटील यांना सुनावले. एकंदरीतच शिवसेनेतील बंडखोर गटाने बाहेर शिवसेनेला थेट आव्हान देऊन हा राजकीय वाद पेटवला असला तरी सभागृहात मात्र उपसभापती गोरे यांनी शिवसेनेची रणरागणी कसा अवतार धारण करू शकते याची चुणूक दाखवून दिली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी देखील या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय सुट्ट्या असल्यामुळे पहिल्या आठवड्यात दोनच दिवस कामकाज झाले. मात्र सभागृहाबाहेर आणि सभागृहात भाजपला शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादीने चांगलेच धारेवर धरून विरोधकांची भूमिका चोख बजावण्याचा प्रयत्न केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात कमालीचा गोंधळ झाला. शाळांच्या वाढीव तुकड्यांच्या अनुदानाच्या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. सभागृहातील उभय बाजूंच्या सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांच्यात खडाजंगी झाली. शेवटी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करून सभागृहातील सदस्यांना आपापल्या जागी बसण्याचे आवाहन केले. तथापि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उत्तरामुळे सभागृहातील सदस्यांचे समाधान न झाल्यामुळे हा प्रश्न राखून ठेवत असल्याचे उपसभापती डॉ. गोर्हे यांनी जाहीर केले आणि पुढील प्रश्न पुकारला. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना वाढीव अनुदान संबंधित त्रुटींच्या पूर्ततेनंतर मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे काय झाले या विषयावर विधान परिषद सभागृहाच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात काही सदस्यांनी उपप्रश्न विचारले होते. अनुदान मंजूर का करण्यात आले नाही? असा सवाल विरोधकांचा होता. यासंबंधीची फाईल ही वित्त विभागाकडे पाठवली असल्याचे उत्तर त्या विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मागील काळातील मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवर स्वाक्षरी केली असताना फाईल पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे का पाठविण्यात आली असा प्रश्न सभागृहात उपस्थित झाला. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदारांनी त्यास हरकत घेतली. आणि सभागृहात गोंधळ सुरू झाला. यावेळी केसरकर यांच्या मदतीला धावून आलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उभे राहून बोलू लागले. मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांकडे वित्त विभाग होता त्यांची व मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झालेली आहे त्यात पुन्हा विभागाला निर्णय घेता येत नाही असे शिवसेनेचे अनिल परब यांनी सांगितले. त्यावेळी सभागृहात गोंधळ झाला आणि सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब झाले. एक मंत्री बसून दादागिरी ची भाषा करत असेल तर आम्हालाही उत्तर देता येईल त्यांच्या खात्याचा विषय होता का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. गुलाबराव पाटील तुम्ही चुकीच्या पद्धतीने हातवारे करीत आहात. मुळात या प्रश्नावर तुम्हाला बोलायला अनुमती दिलेली नाही. तुम्ही खाली बसावे. अशी सूचना उपसभापती डॉक्टर गोर्हे यांनी वारंवार केली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना समज द्यावी असेही त्या म्हणाल्या. तुमची सभागृहात वागायची ही कोणती पद्धत झाली? तुम्ही चौकात उभे आहात का? हे सभागृह आहे! असे म्हणत गोरे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले. शासकीय निधी लागणारी कोणत्याही विषयाची फाईल ही वित्त विभागाच्या मान्यतेसाठी जात असते. वित्त विभागाने त्या फाईलवर पूर्वी काहीही लिहिलेले नाही. या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे; येत्या मंगळवारी संबंधित आमदारांची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असे आश्वासनही मंत्री केसरकर यांनी दिले. दरम्यान यासंदर्भात रेकॉर्डवर काही चुकीचे झाले असेल तर ते तपासून घेण्यात येईल असे उपसभापती गोरे यांनी सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना आमचीच आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. सभागृहात देखील शिवसेनेची कोंडी करण्याचा सत्ताधार्यांचा म्हणजे शिंदे समर्थकांचा हा प्रयत्न मात्र शिवसेनेने हाणून पाडला. उपसभापती गोरे यांनी देखील शिवसेनेच्या रणरागिणी काय असतात हे या निमित्ताने दाखवून दिले.
शेतकर्यांविषयी तळमळ नाही
राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नव्या सरकारने मदत व भरपाईपोटी एक छदामही दिला नाही पण मराठवाड्यातील एका मंत्राच्या सूतगिरणीला पंधरा कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी नियमाला अपवाद करून देण्यात आला; अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. तर, महाराष्ट्रात गेल्या 45 दिवसांमध्ये 137 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषीक्रांती केली. त्यांचा स्मृतिदिन आपण साजरा करीत आहोत. पण; महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना थेट भरीव मदत करण्याची कोणतीच तळमळ दिसत नाही असा टोला दानवे यांनी लगावला. तर मेट्रो आणि बुलेटट्रेनसाठी एका दिवसात 25 हजार कोटींचा निधी देणार हे सरकार शेतकर्यांच्या मदतीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात का हात आखडता घेत आहे? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी केला. राज्याच्या बहुतांश शहरे, गावात खड्डे बुजवा असा टोलाही खडसे यांनी लगावला. अतिवृष्टीच्या प्रश्नावर विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना फक्त ठाण्याचाच विकास दिसत आहे असाही टोला या लगावला. या विषयावर गोपीचंद पडळकर, सुरेश धस व अन्य सदस्यांनी शेतकर्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव सरकारला करून दिली.
त्या बोटींचा दहशतवादाशी संबंध नाही
हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडलेल्या बोटीत एके 47 बंदुका आणि काडतुसे सापडल्याचे पडसाद सभागृहात उमटले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासयंत्रणा सतर्क असून या प्रकरणाची चौकशी देखील पोलीस आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. लवकरच येत असलेला गणेशोत्सव पाहता हाय अॅलर्ट घोषित केला आहे. सर्व यंत्रणा दक्ष आहेत असे सांगून या बोटीचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही. या बोटी ओमान येथील सुरक्षा कंपनीच्या असल्याचे समजते असे ते म्हणाले. 1993 मध्ये घडलेल्या घटनेचा विचार करता तपास यंत्रणा सतर्क झाली असून त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने रायगड जिल्ह्यात रेड अॅलर्ट जारी केला आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवीन पिढीत वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी राज्यात नव्या वाचनालयांना परवानगी देण्यासाठी नव्याने नियम करण्यात येतील. त्यानंतर अशा नवीन वाचनालयांना लवकरच परवानगी दिली जाईल असे आश्वासन उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यात 744 ग्रंथालये व्यवस्थित चालत नाहीत. त्यांची माहिती विभागाकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे नीट न चालणार्या ग्रंथालयांच्या परवानग्या काढून घेतल्या जातील. त्यासाठीचे निकष बदलून ते कठोर केले जातील असेही पाटील म्हणाले. विधान परिषदेचे सदस्य अभिजीत वंजारी, भाजपचे प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यास मंत्र्यांनी वरील आश्वासन दिले असून जिल्हा, तालुकास्तरावर असलेली ग्रंथालये विकसित केली जातील असेही ते म्हणाले.
संघर्ष कोणत्या थराला जाणार?
सभागृहात नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. तसेच विधान परिषदेच्या सभागृहनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्याची घोषणा उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी केली. विधानसभा आणि विधान परिषदेत माजी सदस्य आणि माजी उपमंत्री भरत भाऊ बहेकर, बाबुराव पाचरणे, जनार्दन बोंद्रे, नानासाहेब माने, रावसाहेब हाडोळे आणि उद्धवराव शिंगाडे यांच्या निधनाविषयी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील या दोघांनी वरील नेत्यांचा जीवन परिचय करून दिला सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ते प्रथमच पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. शिवसेनेतील बंडखोरी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे एकाच पक्षाचे मात्र, विरोधकांच्या भूमिकेत असणार आहेत. एकंदरीत पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कामकाजात सत्ताधारी पक्षाला वेळ कमी मिळाल्यामुळे दमछाक होत असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सभागृह नेते असल्यामुळे ते विरोधकांना चोख उत्तर देतील. मात्र मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले आमदार आणि नको असलेली खाती मिळाल्यामुळे नाराज असलेले मंत्री यांची सुरू असलेली धुसफुस मंत्रिमंडळ विस्तारानंतर शांत होणार का हे येणारा काळच ठरवेल. मात्र शिवसेना आणि बंडखोर सेना यांच्यामधील तू तू मै मै ही अधिकच वाढत राहणार त्यामुळे येणार्या काळात शिवसेना आणि बंडखोर सेना यांच्यातील हे धमासान कोणत्या थराला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
शिवसेना आणि बंडखोर यांच्यातील संघर्षाचे सभागृहात पडसाद!
Reviewed by ANN news network
on
August 24, 2022
Rating:

No comments: