अर्थव्यवस्थेवर ’ब्लॅक स्वान’चे सावट

अर्थव्यवस्थेवर ’ब्लॅक स्वान’चे सावट उत्तर प्रदेशातील बुलडोझर, त्यानंतरचे नुपुर शर्मा प्रकरण आणि आत्ता महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग यावर सर्व माध्यमांमध्ये सध्या चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र, या सर्व गोंधळात भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातील एक गोष्ट माध्यमांकडून दुर्लक्षिली गेली आहे. रिझर्व बँकेने सुमारे आठवडाभरापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ’ब्लॅकस्वान’ घटना घडवण्याची शक्यता वर्तविली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. देशातील आर्थिक घडी विस्कटणार आहे. आर्थिक मंदी येणार आहे. त्यामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येतील. नागरिकांच्या खिशातील पैसा कमी होईल. नागरिकांची क्रयशक्ती कमी होईल. थोडक्यात परिस्थिती बिकट होईल असे रिझर्व बँकेला सांगायचे आहे. त्या ब्लॅक स्वान या शब्दाचा हा भयभीत करणारा अर्थ आहे. रिझर्व बँकेने आपणाला सावध केले आहे.आपणाकडील पैसा सांभाळा, जपून खर्च करा, उगाच उधळपट्टी करू नका असे रिझर्व बँक आपणाला सांगत आहे. काय आहे ब्लॅक स्वान घटना नसीम निकोलास तालेब या लेखक आणि गुंतवणूकदाराने ’ द ब्लॅक स्वान‘ हे पुस्तक लिहिले आहे. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर सर्वाधिक विकल्या गेलेल्या पहिल्या 10 पुस्तकात या पुस्तकाचा समावेश होतो. या पुस्तकात तालेब यांनी सर्वप्रथम ’ब्लॅक स्वान’ ही संकल्पना मांडली आहे. 16-17 व्याशतकात पाश्‍चात्य देशात ’स्वान’ अर्थात हंस पांढरेशुभ्र असतात असा समज होता. 17 व्याशतकाच्या मध्यास काही डच दर्यावर्दी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम काळा हंस पाहिला. ते आश्‍चर्याने थक्क झाले. जे त्यांनी पाहिले ते त्यांच्या कल्पनाशक्ती पलिकडचे होते. धक्कादायक होते. या घटनेचा आधार घेत तालेब यांनी अर्थजगतात अचानक घडणार्‍या, अनाकलनीय कारणामुळे घडणार्‍या घटनांना आपल्या पुस्तकात ’ब्लॅक स्वान इव्हेन्ट’ ही संज्ञा दिली आहे. एखाद्या देशातील अर्थचक्र सुरळीत सुरू असताना अचानक तेथे मंदी येणे, या मंदीचा कोणालाही अंदाज न येणे आणि त्याचे आर्थिक परिणाम फार भयंकर असणे ही ’ब्लॅक स्वान’ इव्हेंटची वैशिष्ट्ये आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे तर अचानक येणारी भयंकर मंदी असे या ब्लॅक स्वानची व्याख्या करता येईल. अशी भयंकर मंदी अलिकडच्या काळात 2008 साली जगाला अनुभवायला मिळाली होती. अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स या बँकेने अचानक दिवाळखोरी जाहीर केल्याने संपूर्ण जगाला मंदीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अमेरिकेच्या ट्वीन टॉॅवर्सवर जो हल्ला झाला त्या 9/11 या दुर्घटनेनंतरही काही काळ अशी मंदी आली होती. ब्रेक्झिटनंतर युरोपियन युनियनमध्येही ब्लॅकस्वान इव्हेंट पहायला मिळाला. या घटनांचे पूर्वानुमान अर्थज्ज्ञांना काढता आले नव्हते. 7 लाख 80 हजार कोटींचा खड्डा असाच काहीसा प्रकार भारतात घडण्याचा अंदाज रिझर्व बँकेने वर्तविला आहे. भारतीय बाजारपेठेतून 100 बिलियन डॉलर्स अर्थात सुमारे 7 लाख 80 हजार कोटी रुपये नजिकच्या काळात परकीय गुंतवणूकदार काढून घेतील अशीही भिती रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. ही रक्कम का?कधी? काढून घेतली जाईल या प्रश्नांची उत्तरे अद्यापही ठाऊक नाहीत. त्यामुळे याला रिझर्व्ह बँक ब्लॅक स्वान घटना म्हणत आहे.थोडक्यात अचानक येणार्‍या आर्थिक मंदीच्या शक्यतेकडे रिझर्व्ह बँकेचा निर्देश आहे.तसे झाले तर आपल्या देशाचा जीडीपी साडेतीन टक्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. परकीय गुंतवणूकदारांनी अल्पमुदतीसाठी भारतात केलेली गुंतवणूकही जर काढून घेतली तर हाच जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत घरसण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. आता ही समस्या आणखी नीट समजावून घेण्यासाठी थोड्या वेगळ्या अंगाने तिचा विचार करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या खिशात पैसा असणे आणि बाजारपेठेत पुरेसा पुरवठा असणे ही चांगल्या बाजारपेठेची लक्षणे आहेत. अर्थाात याला अर्थशास्त्रीय परिभाषेत डिमांड - सप्लाय असे म्हणतात. कोरोना काळात जगात सर्वत्र नोकर्‍या कमी झाल्या. व्यवसाय मंदावले. त्यामुळे उत्पादनांची मागणी घटली. त्यामुळे बाजारपेठेत किंचित मंदी दिसून आली. कोरोनाच्या संकटावर मात करून जग त्यातून सावरते न सावरते तोच युक्रेन युद्धाच्या रुपाने नवे संकट उभे ठाकले. त्यामुळे जगातील काही भागावर अन्न आणि इंधनाचे संकट आले आहे. कोरोना चालू असताना अमेरिकेने आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न केले. फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या अखत्यारीतील बँकाकरवी नागरिकांच्या खिशात पैसा चार पैसे जातील अशी पावले उचलली. तेथील नागरिकांच्या खिशात चार पैसे खुळ्खुळू लागले. अमेरिकेतील नागरिकांनी तेथील वित्तिय संस्थांच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. परिणामी ऐन कोरोना काळात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे भारतीय शेआर बाजार उसळी मारू लागला. लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या आणि खिशात चार पैसे असलेल्या भारतीयांनीही मग शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. दरम्यान अमेरिकनांच्या खिशात आलेल्या पैशांमुळे तेथील लोकांची क्रयशक्ती वाढली.त्याचा परिणाम महागाई वाढण्यात झाला. मागील 3 दशकात झाली नव्हती इतकी महागाई आज अमेरिकेत झाली आहे. आज जगातील सर्वच देश महागाईचा सामना करताना दिसत आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासाठी नेहमी एकतर पुरवठा वाढवा किंवा मागणी घटवा हा उपाय करावा लागतो. त्यातील पुरवठा वाढविण्यासाठी उत्पादनाचा वेग वाढवाला लागतो. मात्र, तो मुळातच परमोच्च पातळीवर पोहोचला असल्याने मागणी घटवा एव्हढाच उपाय अवलंबणे शक्य राहिले आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगातील सर्व सरकारे नागरिकांच्या खिशातील पैसा बाहेर काढण्याच्या मागे आहेत. नागरिकांनी बाहेर गुंतवलेला पैसा परत अमेरिकेच्या तिजोरीत आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्याचा परिणाम शेअर, क्रिप्टोकरन्सी, कमॉडिटी यासारख्या सर्वच बाजारांवर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार संस्था भारताच्या बाजारातून 7 लाख 80 हजार कोटी रुपये काढून घेण्याची भिती भारतीय रिझर्व्ह बँकेला वाटत आहे. त्याचबरोबर जवळपास तितकीच अल्पमुदतीची गुंतवणूकही काढून घेतली जाऊ शकते तसे झाले तर जीडीपी आणखी गर्तेत जाण्याची शक्यता आहे. बाजार कोसळला तर, भारतीयांनी केलेली गुंतवणूकही कवडीमोल होण्याचा धोका आहे. त्याचा फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसणार आहे. अनावश्यक खर्च टाळा नागरिकांच्या खिशातील पैसा बाहेर काढून मार्केटमध्ये पडणारा हा खड्डा भरून काढण्यासाठी सध्या भारतात आटापिटा सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेली वाढ त्यामुळे महागलेली कर्जे त्याचकडे निर्देश करतात. या उपायायोजनांमुळे महागाई कमी होईलही. परंतु या देशातील अनेक नागरिकांकडे जगण्यासाठी आवश्यक असणारा पैसाही राहणार नाही. त्यामुळे नजिकच्या काळात चैनीला आळा घाला. अगदी आवश्यक असलेल्या खर्चाव्यक्तिरीक्त खर्च करू नका. दीर्घमुदतीची गुंतवणूक टाळा. स्थावर मालमत्ता, सोनेनाणे यावर अनाठायी खर्च करू नका.काळ प्रतिकूल आहे. त्यात तगून राहणे महत्वाचे आहे याची खूणगाठ मनाशी बांधा असे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. यासर्व संकटाची फारशी चाहूल भारतातील प्रसारमाध्यमांना लागली नसावी असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे.माध्यमांमध्ये अद्यापही महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाचे गुर्‍हाळ सुरू आहे. निसर्गचक्र बदलले? देशात यंदा पाऊसही अत्यंत विचित्रपणे पडत आहे. आसामसारख्या राज्यात महापुराने थैमान घातले आहे. तर, दरवर्षी 7 जूनला कोकणात येणारा पाऊस अद्यापही तेथे नीट सुरू झालेला नाही. देशभरातील पावसाचा पॅटर्न बदलल्याचे यावरून दिसत आहे. तसे झाले तर पुढील हंगामात येणारी पिके नीट येतील का असाही प्रश्‍न आहे. तसे झाले तर पुढील वर्षी देशाला दुष्काळाचा सामना करावा लागेल. आणि तसे घडले तर परिस्थिती आणखी बिकट होईल. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रास्तदराच्या धान्यदुकानांवर यापुढे तांदूळ मिळणार दिला जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. यापुढे रेशनदुकाने ही संकल्पनाच मोडीत काढण्याचा सरकारचा विचार आहे. तसे घडले तर मंदीच्या काळात बुडत्याचा पाय खोलात अशी देशातील गोरगरीब नागरिकांची स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात काय तर भारताची अर्थव्यवस्था ब्लॅक स्वानच्या सावटाखाली आहे. तेव्हा सावधगिरीने वागा. ---------------------------------
अर्थव्यवस्थेवर ’ब्लॅक स्वान’चे सावट <b>अर्थव्यवस्थेवर ’ब्लॅक स्वान’चे सावट</b> Reviewed by ANN news network on June 29, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.