विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब
(विजय भोसले)
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचे तीव्र पडसाद मंग़ळावी विधानपरिषदेत उमटले.विरोधक आणि सत्ताधारी यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दरेकर यांच्यावरील आरोप खोटे असून, हा विरोधकांवर अन्याय आहे असे विरोधकांचे म्हणणे होते. अन्याय करणार्या सरकारचा निषेध असो, विरोधकांचा आवाज बंद करणार्या सरकारचा धिक्कार असो., अशा विरोधकांच्या घोषणा होत्या. तर सत्ताधारी सदस्य अटक करा, अटक करा अशा प्रतिघोषणा देत होते. उभय बाजूच्या सदस्यांनी गदारोळ घातल्यामुळे प्रथम दोनदा आणि तिसर्यांदा दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यावेळी भाजपचे सदस्य भाई गिरकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराचे अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे, सरकार दरेकर यांच्याविरोधात आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप भाई गिरकर यांनी केला. सरकारने अशा पद्धतीने सुडाचे राजकारण करणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. विरोधकांनी सभापतीच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
विरोधी पक्षनेत्यावर अन्याय करणार्या सरकारच्या निषेध असो अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी 25 मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पुन्हा सभागृह साडेबारा वाजता सुरु झाले. पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी कामकाज पुकारले. तेंव्हा भाजपचे सदस्य प्रसाद लाड म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यावर चुकीची कारवाई करण्यात आली आहे. दरेकर हे सरकारच्या घोटाळ्याची प्रकरणे बाहेर काढत आहेत. ही कारवाई चुकीची असून, मी त्याचा निषेध करतो असे लाड म्हणाले.
लाड यांच्या म्हणण्यास भाजपचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी दुजोरा दिला. त्यावेळीस सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी भाजप सदस्यांच्या म्हणण्यास आक्षेप घेऊन दरेकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी केली. तेंव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. यामुळे उपसभापती नीलम गोर्हे यांनी 20 मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केली. पुन्हा तिसर्यांदा सभागृह सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी दरेकर यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्य उभे राहून अटक करा, अटक करा अशा घोषणा देऊन लागले. विरोधकही सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले. या गोंधळातच कामकाजपत्रिकेवरील उर्वरित कामकाज पुकारुन सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याचे सभापती निंबाळकर यांनी जाहीर केले.
-----
विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब
Reviewed by ANN news network
on
March 16, 2022
Rating:
No comments: