देहू येथे बीज सोहळ्यासाठी लाखो भाविकांचा मेळा

देहू : देहुगावातील श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास रविवारी मोठ्या भक्तीभावाने प्रारंभ झाला. मागील दोन वर्षे सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते. परिणामी मोजक्याच मानक-यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले होते. त्यामुळे ‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ अशी स्थिती राज्याच्या कानाकोप-यातून बीज सोहळ्याला हजेरी लावून तुकोबांच्या चरणी लीन होणा-या भाविकांची झाली होती. मात्र, यावर्षी कोरोनाचे प्रमाण घटल्याने तुकोबांच्या दर्शनाची आस मनी बाळगून राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक श्रीक्षेत्र देहूत दाखल झाले. या भाविकांच्या उपस्थितीत बीज सोहळा उत्साहात पार पडला.इंद्रायणीचा काठ लाखो वारक-यांनी फुलून गेला असून आलेल्या भाविकांनी अखंड हरिनाम कीर्तनासाठी घाटावर, तसेच अनेक ठिकाणी मंडप उभारले आहेत. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूंनी शेतात, मैदानात दिंड्यांनी आसरा घेतला आहे. ठिकठिकाणी भजने, हरिपाठ, चिपळ्या, टाळमृदंगांच्या गजर सुरू असून ‘तुका आकाशा एव्हढा’ याची प्रचिती या भाविकांच्या उपस्थितीमुळे येत आहे. मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. श्रींची पूजा, संत तुकाराम महाराज शिळामंदिरात महापूजा झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी १० वाजता वैकुंठस्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान झाले. १२ वाजता वैकुंठ सोहळा कीर्तन झाले. प्रशासनाने भाविकांसाठी शक्य तितक्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वच्छ पाणी, मोफत मास्क वाटप, दर्शनरांगेत भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी छताची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना संकट पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने मास्क नसणाrया भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. भाविकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे, गाभा-यात प्रवेश न करता दुरूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. देहू संस्थान, नगरपंचायत प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाची यंत्रणा भाविकांना शक्य त्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे.
देहू येथे बीज सोहळ्यासाठी लाखो भाविकांचा मेळा देहू येथे बीज सोहळ्यासाठी लाखो भाविकांचा मेळा Reviewed by ANN news network on March 20, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.