राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार अशी गेली 2 वर्षे नुसतीच चर्चा सुरू होती. मात्र, अखेर महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष, युवकअध्यक्ष आणि अल्पसंख्यांक अध्यक्ष बदलण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर घेतला. निवडणुका इतरमागावर्गीय आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच घ्याव्यात असे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे.मात्र, केंद्रसरकार आणि निवडणूक आयोग यांना वेळेतच निवडणुका घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे मुळातच कोरोना महामारीमुळे वॉर्डरचना, इतर मागासवर्गीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे आणि येत्या 13 मार्चला महापालिकेची मुदत संपत असल्यामुळे निवडणुका या एप्रिल अथवा मे महिन्यात घेतल्या जातील असे स्पष्ट चित्र जाणवत आहे. आरक्षणे जाहीर केली असून त्यावर हरकती घेण्याची मुदत सोमवारीच संपली. एकूण 5 हजार 664 हरकती आल्या आहेत. हरकती घेणे ही निव्वळ प्रशासकीय बाब आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपात झाले तर बदल होतील. मात्र, फारसे काही बदल होणार नाहीत हे निश्चित.महिना ते दीडमहिना प्रशासकीय राजवट येईल. त्यामध्ये सत्ताधीश भाजपने गेल्या 5 वर्षात केलेल्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे करू शकतात. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे दादा भाजपचा पर्दाफाश करतील की नाही हे सांगता येत नाही. तर, नवनिर्वाचित शहराध्यक्ष गव्हाणे यांना सर्वांना बरोबर घेऊन जात असताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण या नव्या वॉर्डरचनेत ज्या ज्या ठिकाणी गावठाणाचा भाग आहे त्या ठिकाणी प्रभागरचना स्थानिक मंडळींना अडचणीची ठरणार आहे. तर, भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे दोघे प्रभागरचना आमच्या फायद्याची आहे असे सांगत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. उसने अवसान आणून दिखावा करत आहेत. कारण; भाजपचे महापौर, पक्षनेता यांनी प्रभागरचनेबद्दल नाराजी व्यक्त करून वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा देणे म्हणजे सर्वकाही आलबेल नाही हे यावरून स्पष्ट होत आहे. गव्हाणे यांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना गावकी, भावकीला सांभाळताना राष्ट्रवादीमधील घरभेद्यांना देखील सांभाळणे अवघड काम आहे. त्यामुळे स्वत:चा प्रभाग सांभाळत असताना शहरातील अन्य प्रभागांवर देखील लक्ष ठेवणे महत्वाचे ठरणार आहे. ही महापालिका निवडणूक म्हणजे गव्हाणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सत्वपरीक्षा आहे. कारण, ही कामगिरी यशस्वी ठरली तर; 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील गव्हाणे हे भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील.
अजितवर कै. दामोदर गव्हाणे म्हणजेच त्यांच्या वडिलांचे संस्कार असल्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात प्रवेश करताना वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून एक वेगळा आदर्श निर्माण केला. एक स्वच्छ चारित्र्याचा, अभ्यासू, शालीन, उच्चशिक्षित, ग्लोबल विचारांचा तसेच नैतिकतेची बूज राखणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. कै. गव्हाणे हे उच्चशिक्षित होतेच शिवाय कुस्तीक्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून त्यांनी किताब पटकावला होता. हिंदकेसरी कै. मारुती माने यांचे व त्यांचे घरोब्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. कै. माने यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली होती. शेवटच्याक्षणी सुखदु:खात त्यांनी साथ दिली. कै. गव्हाणे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरी केली. नोकरी करत असतान 1978 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपरिषदेची निवडणूक लढविली. समाजवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आले. राजकारण आणि समाजकारणात त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी निव्वळ राजकारण केले नाही. तर, निवृत्त होईपर्यंत त्यांनी बँकेची नोकरी केली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी पवना सहकारी बँक अडचणीत आली असताना बँकेला सावरण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार विलास लांडे आणि शिक्षणमंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे यांना राजकारण आणि व्यवसायात स्थिरस्थावर करण्याचे मोठे योगदान आहे. अजित गव्हाणे हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण आणि सामाजिक काम करीत असल्यामुळे त्यांची एक वेगळी छाप भोसरी परिसरात आहे.
या नियुक्त्यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. महिलाध्यक्षा म्हणून माळी समाजाच्या कविता आल्हाट यांची नियुक्ती केली. त्या प्राध्यापिका असून मोशी- चिखली- चर्होली या परिसरात माळीसमाजाचे वर्चस्व असल्यामुळे येणार्या निवडणुकीत आल्हाट यांच्या नियुक्तीमुळे भाजपचे गणित या वेळेस चुकणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने हा मुत्सद्दीपणा योग्यरित्या दाखवला आहे. तर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्षपद इम्रान शेख यांच्याकडे सोपवून मुस्लिम समाजाला या निमित्ताने जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर सांगवीमध्ये प्रशांत शितोळे कार्याध्यक्षपद देऊन चिंचवड विधानसभेत स्थानिकांना संधी देऊन बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, पिंपरी विधानसभेसाठी जगदीश शेट्टीाअणि भोसरीसाठी नगरसेवक राहुल भोसले यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली आहे. युवक कार्याध्यक्ष म्हणून युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघासाठी लिंकरोड येथील निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघासाठी प्रसन्न डांगे आणि भोसरीसाठी योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा समतोल साधण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला असला तरी; प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणात कितपत फायदा होईल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
गव्हाणे यांना घरभेद्यांचे आव्हान
या निवडींमुळे पाच वर्षे झोपलेली राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकदम खडाडून जागी झाली आहे. ज्या दिवशी जाहीर केल्या त्यावेळी हॉटेल कलासागर या ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी आणि मुंबई पुणे महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी यामुळे एक वेगळे चैतन्य संघटनेमध्ये संचारल्याचे जाणवले. गटतट विसरून खांद्याला खांदा लावून सगळे आजी, माजी एका व्यासपिठावर आले. 2017 मध्ये स्वप्नातही सत्तांतर होईल असे वाटत नव्हते ते झाले यामध्ये अजितदादांचा फाजील आत्मविश्वास नडला. या निवडणकीत उमेदवारांना निवडणुकीसाठी दादांनी 1 रुपयाही दिला नाही. त्यांनी स्थानिक नेते संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, नाना काटे योगेश बहल, विलास लांडे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही. उलट भाजपने प्रत्येक उमेदवाराला आर्थिक रसद पुरवून मूर्तीघोटाळा राष्ट्रवादीवर थोेपवून सत्ता खेचून आणली. एव्हढेव नव्हे तर, भाजपच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून चोख उत्तरही दिले गेले नाही. केवळ विकासकामे विकासकामे करीत दादा हातावर हात देऊन बसले. राष्ट्रवादीने ज्यांना मोठे केले तेच भाजपच्या वळचणीला जाऊन राष्ट्रवादीला नामोहरम केले. आणि गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत विरोधीपक्ष म्हणून जी कामगिरी केली आहे ती शहरवासियांना परिचित आहे. उलट भाजपला अप्रत्यक्ष मदत करून अनेक ठिकाणी भागीदारी मिळविण्यात आणि भाजपच्या काळात भ्रष्टाचाराचा कळस झाला असताना देखील राष्ट्रवादी मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे अजित गव्हाणेंना पक्षातीलच घरभेद्यांचे आव्हान आहे.
भाजपच्या गैरकारभारात राष्ट्रवादी गप्प का?
राष्ट्रवादीची भक्कम सत्ता जायला केवळ 25 लाखांच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा घोटळा कारणीभूत ठरला. त्यापेक्षा शेकडोपटीने मोठे घोटाळे या पाच वर्षांत शहरातील जनतेने पाहिले आहेत. महापुरुषांच्या स्मारकातदेखील कोट्यवधी रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. कंत्राटी कामगारांचे ठेके नगरसेवकांनीच वाटून घेतले आणि महिन्याला पाच सहा कोटींची मलई ठरवून घेतली. एव्हढेच नव्हे तर कोरोनासारख्या महामारीत ठेके घेऊन आपण समाजाचे किती पाईक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात देखील असणारी भागीदारी आणि पुढे न्यायालयापर्यंत घडलेले रामायण हे काही कमी नाही. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांकडे विरोध करण्याचे काम दिले तेसुध्दा सहभागी झाल्याने झाल्याने विरोध हा नावापुरता राहिला. थेट पद्धतीने दिलेली कामे, अनावश्यक कामे, वाढीव खर्चाची कामे, सल्लागारांच्या नियुक्त्या, कंत्राटी कामगारांचे ठेके, बनावट वृक्षगणना, होर्डींग्जचा घोटाळा अशी लांबलचक यादी आहे. अवैध बांधकामे वाढतच आहेत. झोपडपट्टी दुपटीने वाढली आहे. गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचे लक्ष गुन्हेगारी नियंत्रणा ऐवजी बिल्डरला जमिनींचे ताबे मिळवून देण्याकडे अधिक आहे. आता भाजपाकडून सत्ता खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागल्याचे आशादायक चित्र गव्हाणे यांच्या निवडीच्या निमित्ताने दिसले.
भाजपला अंगावर घेणार?
आमदार जगताप हे धूर्त राजकारणी असून त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा यांच्यावर राजकीय टीकाही केली नाही. अथवा अन्य बाबींवरही वक्तव्य केलेले नाही. दादा आणि जगताप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघात राष्ट्रवादीला जादा की जागा मिळतील की काही जागांबाबत अप्रत्यक्ष समझोता होईल अशी शक्यताही आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत जगताप तडजोड करणार नाहीत. तर, भोसरीमध्ये गव्हाणे यांनी महेश लांडगे यांच्यासमोर स्थानिकपातळीवर यापूर्वीच समझोता केल्याची चर्चा आहे. त्यामुळे गव्हाणे लांडगे यांच्या राजकीय भूमिकेवर गरजणार की मवाळ भूमिका घेणार हे येणारा काळ ठरवेल. पिंपरी विधानसभेमध्ये अण्णा बनसोडे यांचे कितपत चालेल. कारण या ठिकाणी योगेश बहल हे नेहमी किंगमेकरची भूमिका बजावतात. शिवाय, यावेळेस प्रभागरचना करताना भाजपचे सारंग कामतेकर यांची मदत घेऊन प्रभागाची तोडमोड केल्याची चर्चा आहे. गव्हाणे, बहल आणि कामतेकर यांनी प्रभागरचनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. तर, येणार्या निवडणुकीत भाजपच्या सीमा सावळे आणि सारंग कामतेकर राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, सावळे आणि कामतेकर यांना राष्ट्रवादीतील एका गटाचा मोठा विरोध आहे. त्यांना पक्षात घेऊ नये अशी मागणी अजितदादांकडे केल्याचे समजते. यांनी शिवसेना संपविली. भाजपमध्ये वाद निर्माण केले. आता राष्ट्रवादी संपवतील अशी भीतीही काहीजणांनी दादांजवळ व्यक्त केल्याची चर्चा आहे. एकंदरीतच बहल यांचा हा राजकीय डाव यशस्वी होईल की पुन्हा राष्ट्रवादीला मागचे दिवस येतील हे येणारा काळच ठरविणार आहे. तर, दादांचे पुत्र पार्थ यांनी प्रभागरचनेसाठी 4 महिने प्रत्येक भागात फिरून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आणि प्रभागरचना केली. मात्र, नंतर दादांना भेटून पुन्हा प्रभागरचना करण्यात आली. उदाहरण द्यायचे झाले तर, सांगवीमध्ये 4 चा प्रभाग असून शितोळे पुन्हा एकमेकांसमोर येतील अशी स्थिती झाल्यामुळे नाराजी पसरली आहे. खुद्द पार्थ देखील नाराज असून या निमित्ताने पार्थला पिंपरीतल्या राजकारणात थेट संबंध आला असता. मात्र, दादांनी यू टर्न का घेता हे कळत नाही.एकंदरीत राष्ट्रवादीने सर्व खटाटोेप केला असला तरी दादांच्या मनात नेमकी सत्ता पाहिजे की नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच राष्ट्रवादीपुन्हा सत्तेत येण्याच्या आशा पल्लवित होतील. शिवाय गव्हाणे यांनी आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला अंगावर आणि शिंगावर घेतल्याशिवाय नेतृत्वाची चमक दिसणार नाही हे मात्र निश्चित.
नात्यागोत्याच्या राजकारणात गव्हाणेंची सत्वपरीक्षा!
Reviewed by ANN news network
on
February 16, 2022
Rating:
Rashtrwadi speaker
ReplyDelete