पिंपरीत ओमिक्रॉनचा शिरकाव, बेफिकिरी टाळा!

 
जगभरात सुमारे २१ महिने झाले कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात भारतामध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने कमी होत चालले आहेत. ही चांगली बाब असून आपल्या देशाने शंभर कोटी पेक्षा अधिक लसीकरणाच्या पहिल्या डोसचे उदिष्ट पार केले आहे. मात्र, अजूनही लहान मुलांच्या बाबतीत लसीकरण करण्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे इयत्त्ता पहिली ते सातवीपर्यंत शालेय वर्ग सुरू करायचे की नाही? याबाबत सांशकता असताना कोरोना संसर्ग संदर्भातील तज्ञ समितीने १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या. तोच ओमिक्रॉन नावाचा नव्या कोरोनाचा उगम दक्षिण अफ्रिकेत झाला. आणि बघता-बघता पुणे, पिंपरी- चिंचवड, डोंबविली या भागात याचे आठ रूग्ण सापडले. तर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात गेल्या ७२ तासात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून त्या ठिकाणी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. एकंदरीत देशातील, राज्यातील अर्थ व्यवस्था सुरळीत होत असताना रोजगारही हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ओमिक्रॉनच्या शिरकावामुळे मात्र आता देशासह राज्यात चिंता वाढली आहे. त्यातच पिंपरी- चिंचवड शहरात सहा रूग्ण आढळल्यामुळे चिंता तर आहेच. मात्र, ही चिंता दुर करण्यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. मात्र, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये जणू काही  कोरोनाच नाहीसा झाला आहे, अशा वातावरणात नागरिक सर्वत्र संचार करत आहेत. मास्क न लावणे, गर्दी करणे हे आता सरार्स पाहण्यास मिळत आहे. मात्र, ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. आज शहरात ६ रूग्ण आढळले तरी त्यांचा सहभाग इतर लोकांशी आल्यामुळे संसर्ग अधिक वाढू शकतो. त्याचबरोबर नागरिकांच्या निष्काळजीमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये हा अधिक संसर्ग वाढेल, याची जाण पिंपरी- चिंचवडकरांनी घेतली पाहिजे. जरी कायदा आणि पोलीस बळ असले तरी नागरिकांच्या हातातच सतर्क राहण्याचे असल्यामुळे आपल्यावर आलेले ओमिक्रॉनचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी उद्दामपणा टाळावा. अन्यथा संसर्ग झपाट्याने वाढल्यास शासन अथवा महापालिकेस दोष देणे योग्य होणार नाही.  
२०२० मार्च पासून अवघ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले. लाखो लोक मृत्यूमुखी पडले. जगभरातील अर्थ व्यवस्था ही कोलमडली. याचा परिणाम भारत देशावरही झाला. अनेकांचे रोजगार गेले. औद्योगिक वसाहती ओसाड पडल्या. गेल्या ६ मन्यिापासून कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले. देशात सोमवारी आठ हजार ८९५ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. आजपर्यंत देशातील एक रूग्ण संख्या ३ कोटी ४६ लाख ३३ हजार २५५ वर पोहचली आहे. तर गेल्या २४ तासात २ हजार ७९६ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. याचा अर्थ अजूनही दररोज कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. रूग्ण संख्या आणि मृत्यू दर घटला असला तरी ओमिक्रॉनमुळे जानेवारीत तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉन वेगाने वाढत असून त्याचा संसर्ग अधिक होत आहे, असा दावा काही तज्ञांचा आहे. तर डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचै सौम्य लक्षणे आहेत. असाही काही तज्ञांचा दावा आहे. तज्ञांची मते भिन्न असल्यामुळे त्याचबरोबर ओमिक्रॉनवर अद्यापही संशोधन झालेले नाही. यावर शास्त्रज्ञ काय उपाय योजना करता येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सध्या यावर उपचार काय करायचे, याबदल देखील संदिग्धा आहे. दोन लसीकरण झाल्यानंतर ओमिक्रॉनसारख्या विषाणूला रोखण्यासाठी बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे का? याबाबतीत देखील विचारमंथन सुरू असून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला या संदर्भात विचारणा केली आहे. दक्षिण अफ्रिकेत सर्व प्रथम सापडलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने वाढत आहे. देशातील कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. येत्या जानेवारी महिन्यात ओमिक्रॉनची देशात सौम्य लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर फेब्रुवारी, मार्च महिन्यात या लाटेचा फैलाव अधिक असेल, अशी भिती हैद्राबाद येथील आयआयटी आणि कानपूरच्या आयआयटी येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. गेल्या एप्रिलमध्ये दररोज सुमारे चार लाख रूग्ण आढळत होते. दुस-या लाटेच्या दरम्यान, कोरोना संसर्गाने उच्च्चांक गाठला होता. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नव्या ओमिक्रॉनचा दररोज दोन लाख कोविड संसर्ग पोहचू शकतो, असा दावा या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हा धोका या शास्त्रांनी व्यक्त करत असताना येणा-या वर्षाच्या सुरूवातीला ओमिक्रॉनची लाट सौम्य असली तरी यावर नियंत्रण करण्यासाठी रात्रीची संचारबंदी, सौम्य लॉकडाऊन, गर्दीवर निर्बंध या उपाय योजना केल्या तर ओमिक्रॉनचा प्रसार रोखता येऊ शकेल. 
पिंपरीत ओमिक्रॉन   
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सर्वप्रथम ओमिक्रॉन या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणाही जागरूक झाली असून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आरोग्य यंत्रणा व अन्य वरिष्ठ अधिकाèयांची तातडीची बैठक घेऊन राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून या संदर्भात काय उपाय योजना कराव्यात, याचे मार्गदर्शन घेतले. त्यादृष्टीने आयुक्त पाटील यांनी सोमवारी रात्री नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी महापालिकेतर्फे निवेदन प्रसिध्द करण्यात आले.  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे सहा रूग्ण आढळल्यामुळे सहाजिकच नागरिकांची आणि महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.  या सर्व रुग्णांवर  पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांमध्ये व ओमीक्रोनची सौम्य लक्षणे आढळली आहेत. महापालिका प्रशासनाने नागरिकांना घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहनही केले.  परदेशातून शहरात येणाèया प्रत्येक नागरिकांची चाचणी केली जात आहे. होम क्वारंटाईन केले जात आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग  झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ६ रुग्णांपैकी १ रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत. ५ जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाच्या उपचार पद्धतीनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. परदेशातून शहरात १३८ नागरिक आले आहेत. त्यातील ८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ जण आणि त्यांच्या संपर्कातील ९ जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर, ७० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. विमानतळ, खासगी प्रयोगशाळेत १९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. सर्वजण होम क्वारंटाईन आहेत. १६ जण महापालिका क्षेत्राबाहेरील आहेत.  ओमिक्रॉनचा हा नवीन व्हेरिएंट आहे का नाही हे  तपासण्यासाठी १० जणांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग करिता पुणे एनआयव्ही येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाचे प्रतिक्षा आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून किती जणांना लागण होत आहे हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिस-या लाटेला सुरुवात झाली आहे असे म्हणता येणार नाही असे आयुक्त पाटील यांचे म्हणणे आहे. 
परदेशातून शहरात येणा-या लोकांबाबत सतर्क राहिलो. तर, ओमिक्रॉनचा प्रसार रोखता येईल. कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे. या नव्या ओमिक्रॉनचा रूग्णांसाठी महापालिकेत यंत्रणा सज्ज आहे. १०२ बेड असलेले नवीन भोसरी रुग्णालय ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे. नवीन जिजामाता रुग्णालय लहान मुलांसाठी राखीव आहे. तर, थेरगाव आणि आकुर्डी रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांसाठी असणार आहे. रुग्ण वाढल्यास जम्बो कोविड केअर सेंटर, अॅटो क्लस्टर सेंटर सुरु करण्यात येईल. तर, वायसीएम रुग्णालय नॉन कोविड ठेवण्यात येणार आहे.
नव्या ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत?
 ओमिक्रोनची लक्षणे मागील कोरोना व्हेरिएंटसपेक्षा थोडी वेगळी आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या उद्भवतात.  शरीराचे तापमान वाढते. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशन (सामा) च्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी या बाबतीत बोलताना ही संपूर्ण जगासाठी चिंतेची स्थिती असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा वेरियंट चिंतेचा विषय असल्याचे नमूद केले आहे. अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. परंतु ओमिक्रॉनला शोधणा-या डॉक्टरांनी दिलासादायक बातमी दिली आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. पण त्यांनी या संदर्भात सावध केले आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी रोगाची तीव्रता जाणून घेण्यापूर्वी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे असे डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्यामते आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेले आढळून आलेले बहुतेक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, तर काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाले आहेत, जर असे असेल तर सध्या तरी डॉक्टर आणि शास्त्रांज्ञानाच्या हाती असलेल्या माहितीवरून हा विषाणू जीवघेणा नसावा मात्र त्याचा संसर्ग फार वेगाने होत असावा असा निष्कर्ष काढला आहे. 
पुर्वी ज्या वेळेस कोरोना आला, त्यावेळेस जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली होती. रोज नव-नवीन आदेश आणि सुचना जागतिक आरोग्य संघटना देत असल्यामुळे त्यावेळेस संभ्रमही निर्माण झाला होता. 
मात्र, या संसर्ग ज्यावेळी झपाटट्याने झाला, त्यावेळेस अमेरिका, इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि भारत या देशामध्ये कोरोनाने थैमान मांडून मृत्यूचे आकडेही मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, कोरोनावर संशोधन करून ज्या लसी निर्माण केल्या, त्याचा परिणाम सकारात्मक आल्यामुळे हळूहळू कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. आणि वाढलेली चिंता कमी झाली. जगभरात कोरोनाच्या लसीवर भर देऊन प्रत्येक देशाने योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोरोना आटोक्यात आला. आणि पुन्हा एकदा थंडीच्या मौसमात या नव्या ओमिक्रॉनमुळे जगभरात चिंता पसरली असून आरोग्य यंत्रणा आणि शास्त्रज्ञ यावर उपाय योजना करण्यासाठी रात्रदिवस झटत आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये यापुर्वीही कोरोनाने थैमान घातले होते. आणि यावेळेसही नव्या ओमिक्रॉनची देशात सर्वाधिक रूग्ण पिंपरी- चिंचवडमध्ये आढळल्यामुळे आता सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे.  नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. दोन व्यक्तींनी परस्परांमध्ये पुरेसे अंतर ठेवून वावरावे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा कटाक्षाने वापर करावा. हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करावे. याबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी ती त्वरित घ्यावी. ज्यांचा पहिला डोस घेऊन झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. आणि, या विषाणू पासून स्वतःचा बचाव करावा प्रत्येक ठिकाणी शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेने आपल्यासाठी काही करावे ही अपेक्षा अशा आणीबाणीच्या काळात सर्व नागरिकांनी बाळगणे योग्य ठरणार नाही. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी. त्यामुळे आपला, आपल्या नातेवाईकांचा, कुटुंबाचा आणि समाजाचा त्रास आपण काही अंशी कमी करण्यात यशस्वी होऊ एवढे जरी केले तर सामाजिक जाणिव राखली आणि या संकटावर मात करू शकलो, याचे समाधान मिळेल.
पिंपरीत ओमिक्रॉनचा शिरकाव, बेफिकिरी टाळा! पिंपरीत ओमिक्रॉनचा शिरकाव, बेफिकिरी टाळा! Reviewed by ANN news network on December 07, 2021 Rating: 5

2 comments:

  1. ओमीक्रॉन चा शिरकाव होऊ नये म्हणून गर्दी आणि मास्क वापरणे गरजेचं आहे जनता ओपन सर्व झाल्याने मोकाट सुटली आहे त्यांना आळा बसणे हि अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या बातमी ने निश्चित विचार करतील लोक🙏🙏👍थँक्स भोसले सरजी

    ReplyDelete

Powered by Blogger.