... तर आमदार महेश लांडगे दिल्या घरी सुखी राहतील!

भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांना प्रकाशझोतात कसे यायचे हे आता नवीन राहिलेले नाही. देशातील सर्वसामान्य जनतेलाही कळून चुकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भावनेला हात घालून आपण जनतेशी किती प्रामाणिक आहोत, हे त्यांनी ’मन की बात’ मधून अनेक वेळा अवघ्या देशाला दाखवून दिले आहे. त्याचाच कित्ता भारतीय जनता पक्षाचे सर्वजण गिरवत आहेत. भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा अथवा भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका करणे, भाजपला सत्तेपासून रोखणे या घटना पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपली राजकीय निती खालच्या थराला नेवून अऩेकांना जेरीस आणले आहे. याची उदाहरणे द्यायची झाली तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांना ईडी (अंमलबजावणी संचनालय), सीबीआय (केंद्रीय गुप्तचर खाते), आयकर विभाग आदीचे ससेमिरे मागे लावून अनेकांचे राजकीय जीवन त्याचबरोबर व्यक्तीगत जीवनातून उठविण्याचा जोपर्यंत सुरू आहे. तो आपण पहातच आहोत. राज्यात कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे काम उत्कृष्ट असताना देखील या कामात देखील अडचणी निर्माण करणे, केंद्राकडून मिळणारा मदत कार्यासाठी तुटपुंजा निधी, राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचे भिजत ठेवलेले घोगडे, निसर्गाचे आस्मानी आलेले संकट यावर राज्यातील विरोधी पक्षनेते व भाजपचे अन्य नेते यांनी सरकारला वारंवार कोडींत पकडून केलेली टीका यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेते आक्रमक होत नाहीत. कारण, केंद्र सरकारने आजपर्यंत राज्यात केलेल्या कुरघोड्या हे एकमेव कारण आहे. भाजपच्या दबावतंत्र राजकारणामुळे आज भाजपमधील अनेक नेते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये येण्यास उत्सूक आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुर्तास काही जणांचा प्रवेश लांबविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वावड्यांना आता ऊत आला असून भाजपचे आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा स्वगृही येतील, अशी स्वप्ने शहर राष्ट्रवादीमधील काही मंडळींना पडू लागली आहेत. एवढेच नव्हे तर या मंडळींनी थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. वास्तविकता हे प्रत्यक्षात सार्थ होऊ शकते का? कारण, खुद्द महेश लांडगे यांनी आपण भाजपामध्ये आनंदी आहोत आणि भाजपमध्येच राहणार आहोत, हा खुलासा करून या विषयाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक मंडळी भाजपच्या दबावतंत्रामुळे उघड बोलू शकत नाहीत. कारण, ईडी, सिडी, बिडी मागे लावली तर बिनभाड्याच्या खोलीत बसावे लागेल. ही मोठी भिती असल्यामुळे कोणी हिंमत करणार नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे लांडगे हे आता दिल्या घरी सुखीच राहतील. साधारणतः लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आल्यानंतर अनेक जण या-त्या राजकीय पक्षामध्ये उड्या मारत असतात. हे राजकारणात नवीन नाही. मात्र, देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर संपूर्ण देशभर एकहाती सत्ता गाजविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करित दक्षिण भारत, ईशान्य भारत वगळता सर्वत्र आपले पाय रोवण्यास प्रयत्न सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर बहुमताच्या जोरावर शेतकर्‍यांच्या विरोधी कायदा, सहकार खात्या विषयी केंद्राने निर्माण केलेले नवीन मंत्रालय, अमेरिकेचा विरोध झुगारून अफगानिस्तानला केलेली मदत, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने घुसखोरांना रोखण्यात केलेली कामगिरी आणि याचा राजकीय फायदा उचलण्याचा केलेला भाजपने प्रयत्न या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर अखंड भारतामध्ये भाजपला आपले पाय रोवायचे असून त्यासाठी पक्षातील सर्व तत्वे बाजूला ठेवून वेगवेगळ्या पक्षाबरोबर केलेली हात मिळवणी हे सर्व सत्ताधीश बनण्याचे धोतक आहे. आणि यातूनच महाराष्ट्रासारखी आर्थिक राजधानी असलेले राज्य आपल्या हातून गेल्यामुळे भाजपला हे पचले नाही. म्हणूनच आज महाविकास आघाडी सरकारविरोधात सर्वच उपाय योजना करित सरकारला जेरीस आणले आहे. सुशांतसिंग आत्महत्या, कंगना राणौत, पोलीस खात्यातील सचिन वाझे, पूजा चव्हाण आत्महत्या, राज्यातील कोरोना महामारी, राज्यावर आलेले नैसर्गिक संकट, राज्यपाल नियुक्त 12 आमदार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे लावलेला ईडीचा ससेमिरा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलाव प्रकरणी लावलेला ससेमिरा या सर्व प्रकरणांमध्ये केंद्राच्या हस्तक्षेपामुळेच राज्य सरकारला प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू त्रास देण्याचा जोप्रयत्न सुरू आहे, त्यामुळे अनेकांना जरी भाजपसोडून इतर पक्षात जायची इच्छा असली तरी ते जावू शकणार नाहीत. अशी वस्तुस्थिती भाजपने निर्माण केली आहे. हे नाकारता येत नाही. आमदार महेश लांडगे राजकारणात एवढ्या वेगाने प्रकाशझोतात आले. त्यामागे त्यांची रणनिती आणि प्रसिध्दीचा स्टंट महत्वाचा आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे महेश लांडगे हे मामेभाचे आहेत. लांडगे यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधील विद्यार्थी संघटनेपासून सुरू झाला. विलास लांडे यांनी आमदार झाल्यानंतर गव्हाणे वस्ती महापालिका पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मामे भाच्याला म्हणजेच लांडगे यांना संधी दिली. आणि येथून त्यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला. दुसर्‍यांदा महापालिकेत निवडून आल्यानंतर त्यांना थेट स्थायी समितीचे सभापतीपद बहाल केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत आपल्या मामा विरूध्दच भाच्याने दंड थोपटून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत स्थानिक मंडळी आणि बाहेरच्या मंडळींनी लांडगे यांना निवडून आणले. आणि लांडगे यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. त्यानंतर लांडगे यांनी समाजमाध्यम, प्रसिध्दी माध्यम यासाठी काही अभ्यासू लोकांची नियुक्ती करून जो त्यांनी फंडा राजकीय कारणासाठी वापरला, त्यात ते यशस्वी झाले. अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर भाजपचे संलग्न सदस्य राहिले. कारण, त्यांच्या प्रभागातील सेन्चुरि एन्का कॉलनीजवळील पादचारी पुलाचे अंदाजपत्रक 95 लाखांचे असताना ते साडेसात कोटींवर गेल्यामुळे भाजपमधीलच एका नेत्याने याची ’फाईल’ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविल्यामुळे भाजपने त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी दबावतंत्र वापरले. आणि ते संलग्न सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी इंद्रायणी थडी, कुस्ती स्पर्धा याचे उत्कृष्ट नियोजन करून या समारंभास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कार्यक्रमास बोलाविले. हा कार्यक्रम पाहून खुद्द फडणवीस देखील भारावून गेले. आणि लांडगे हे भाजपच्या गळ्यातील ताईत बनले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम, भाजपच्या बैठका यामध्ये पुढाकार घेऊन नेत्यांना विश्वास दाखविला. त्यामुळे ते पुर्णतः भाजपमय झाल्याची प्रचिती या नेत्यांना येऊ लागली. पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्षपदाची निवडणूक आल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी महेश लांडगे यांना अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव प्रदेश भाजपच्या नेत्यांनी ठेवला. त्यावेळी सर्वांनी हा प्रस्ताव मान्यही केला. आणि अखेर शहर भाजपची माळ लांडगे यांच्या गळ्यात पडली. मात्र, यामध्ये देखील भाजपचे कुटील राजकारण होते. जगताप यांच्यानंतर शहरात भक्कम नेतृत्व कोण देऊ शकते? आणि त्यांनी पुन्हा भाजप सोडून गडबड करू नये म्हणून शहराध्यक्षपदी जखडून ठेवले की हालचाल करणार नाहीत. आणि ही राजकीय खेळी खेळून भाजपने बरोबर राजकीय डाव साधला. कारण, ज्या भाजपला 13 सदस्यांपेक्षा जास्त संख्या महापालिकेत मिळू शकली नाही. त्या महापालिकेत सत्ता आणायची असेल तर आमदार जगताप, आमदार लांडगे या दोघांवर जबाबदारी टाकली की निश्चित सत्त्ता येऊ शकते. शिवाय भाजपची राजकीय निती याचा वापरही केला जाणार होता. आणि या सर्वांचा मेळ साधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत 77 सदस्य निवडून आले. अपक्ष 5 सदस्यांनी भाजपची संलग्नता स्विकारली. आणि ही 82 संख्या झाल्यामुळे महापालिकेत भाजपला न भुतो न भविष्यतो असे पाशवी बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत झालेला पक्ष असून यातील कोणतेही निर्णय पक्ष पातळीवर घेतले जातात. व्यक्तीपेक्षा संघटनेला मोठे महत्व असल्यामुळेच भाजप आज सर्व राजकीय पक्षात एक क्रमाकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या व्युवरचेनमुळेच आज देशात भाजप मोठ्या संख्येने सत्तेवर आले. आणि सर्व सत्ताही मोदी यांच्या भोवती केंद्रीत झाल्यामुळे पक्षामध्ये अन्य नेत्यांना कोणतेच स्थान नसल्याचे आपण पहात आहोत. आणि त्या दृष्टीकोणातूनच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हेच सर्व राजकीय आराखडे वापरून सत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्त्ता आल्यानंतर पदे वाटपात देखील दोन्ही आमदारांच्या शब्दाला भाजप नेत्यांनी होकार देत साडेचार वर्ष सत्ता गाजविली. एखादा निर्णय वगळता इतर सर्वच निर्णय स्थानिक नेत्यांवरच अवलंबून ठेवले होते. आमदार लांडगे यांचा महापालिकेत हस्तक्षेप वाढल्यामुळे आमदार जगताप यांनी महापालिकेत काही बाबतीत हात आखडता घेतला. भाजपमध्ये संघटन महत्वाचे असल्यामुळे संघटनेबाबतीत वरिष्ठ नेत्यांकडून या दोन्ही आमदारांवर कायम दबाव असतो. शिवाय राष्ट्रवादी सारखे भाजपमध्ये स्वातंत्र्य नाही. याची कल्पना आमदार लांडगे यांना आहेच. जरी पक्षात घुसमट होत असली तरी भाजप सोडून जाणे एवढे सहजा-सहजी नाही. कारण, महाविकास आघाडी सरकारमधील काही जणांची कशाप्रकारे भाजपने सत्तेचा वापर करून अवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे आगीतून जावून फुपाट्यात पडल्यासारखी अवस्था होईल. याची कल्पना लांडगे यांना असल्यामुळे ते भाजप सोडू शकणार नाहीत. कारण, नुकताच मैत्री दिन झाला. यानिमित्ताने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, भाजपचे राजेश पिल्ले, माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांची नगरसेवक असल्यापासून मैत्री आहे. मैत्री दिनानिमित्त हे सर्व एकत्र आले होते. आणि त्यांनी टी-पार्टी केली. तसेच सर्व मित्रांच्या डान्सचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्याने मैत्रीची चर्चा रंगली होती. पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी ’कमळ’ सोडून परत राष्ट्रवादीत या’ असे सांगण्यासाठी काल आम्ही मित्राला भेटलो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याची मागणी आम्ही अजितदादांकडे केली होती. पण, आमच्या छोट्या कार्यकर्त्यांचे त्यावेळी ऐकले नाही. दादांना माहिती चुकीची दिली. महेश लांडगे यांना जर तिकीट दिले असते, तर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली नसते’’. अशी भाबडे वक्तव्य मिसाळ यांनी व्यक्त करताच आमदार लांडगे यांचा भाजपमध्ये काम करताना जाच होत आहे, असे आम्हाला दिसत आहे. म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला आम्ही दिला असल्याचे ते म्हणाले. यावर शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून आम्ही 2016 मध्येच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही 2019 मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये काम करण्याचा अनुभव अतुलनीय आहे. मी भाजपामध्ये आनंदी आहे. एव्हढेच नाही, तर मी भाजपामध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे. त्यानंतर समाजसेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत अखेरपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा खुलासा लांडगे यांनी केला आहे’’. मात्र, आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, आणि भाजप पदाधिकार्‍यांमध्ये वेगळा गैरसमज निर्माण होईल. त्यामुळे आमदार लांडगे यांनी तातडीने फेसबुकवर आपला खुलासा करून राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांना पुर्णविराम दिला. एकंदरीत लांडगे हे आता दिल्या घरी सुखीच राहतील, यात शंका नाही.
... तर आमदार महेश लांडगे दिल्या घरी सुखी राहतील! ... तर आमदार महेश लांडगे दिल्या घरी सुखी राहतील! Reviewed by ANN news network on November 18, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.