राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन वर्ष होतील. या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पक्षाने सातत्याने सत्तेचे स्वप्न पाहत राज्यातील जनतेला आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे ’मुंगेरीलाल के हसिन सपने’ याप्रमाणे भाजपचे नेते स्वप्नात आहेत. आणि आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्यानंतर महाविकास आघाडीत देखील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील अंतर्गत मतभेद आणि हेवेदावे हे देखील लपून राहिले नाहीत. अंतर्गत आशा प्रकारचे खटके उडत असताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते मात्र, सरकारला धोका नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. याचा अर्थ काही झाले तरी सत्ता जाता कामा नये. हेच या मागचे कारण असावे. औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या इमारतीच्या
भूमीपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाषण करताना व्यासपीठावरील आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणत खळबळ उडवून एका नव्या राजकीय चर्चेला सुरूवात करून दिली. या वक्तव्याने सर्व दुरचित्रवाहिन्या त्याचबरोबर दुसर्या दिवशी सर्व वतर्र्मानपत्रात यावर मथळे आले.
आणि पुन्हा एकदा भाजपमधील नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सांगण्याचे तात्पर्य राजकारणात कधी आणि काय घडेल आणि एखाद्या वाक्यामुळे राजकारणातला रंगच वेगळा निर्माण होतो, हे अनेक वेळा आपण केंद्र असो, राज्य असो अथवा स्थानिक पातळीवर असो अशा वक्तव्यामुळे घडामोडी घडलेल्या आहेत. अथवा त्याविरूध्द अनेक बाबी घडल्याचेही उदाहरणे आहेत. महाविकास आघाडी सरकारला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड़णुका येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये घेणे फायद्याचे ठरेल. त्यादृष्टीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच मुंबई येथे निवडणुकासंदर्भात त्यांनी जाहीर वक्तव्य केले आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोरोनाचे महासंकट असताना देखील पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पड्डूचेरी या राज्यात निवडणूका झाल्या. त्यामुळे आता कोरोनाची रूग्ण संख्या कमी असल्यामुळे महाराष्ट्रात 15 महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका या फेब्रुवारीमध्ये होतील. त्यादृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पिंपरी- चिंचवडचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी- चिंचवडची सत्ता सलग 15 वर्ष ताब्यात ठेवून
शहराचा चेहरा मोहरा बदलला. मात्र, राष्ट्रवादीमधीलच स्थानिक नेत्यांनी भाजपशी हात मिळवणी करून राष्ट्रवादीबरोबर फारकत घेऊन राष्ट्रवादीला दणका दिला. अशा परिस्थितीत आपण विकास कामाच्या नावावर पुन्हा सत्तेत येऊ, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फाजील आत्मविश्वासावर आणि स्थानिक नेत्यांच्या विश्वासावर महापालिका भाजपच्या ताब्यात गेली. हा पवारांच्या दृष्टीकोणातून राजकीयदृष्टट्या मोठा धक्का बसला होता. यास काही धोरणे अजितदादांचीही चुकली आहेत. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांवर अतिविश्वास ठेवून त्यांनीच राष्ट्रवादी संपविली. मात्र, आता सत्तेच्या चाव्यामुळे दादांनी पुन्हा महापालिका ताब्यात घेण्यासाठी जी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे, ती पाऊले योग्य आहेत का? कारण, याच सरदारांनी आपला घात केला. तेच सरदार पुन्हा घेऊन मोट बांधत असाल तर सावधानता महत्वाची आहे.
राज्यात तीन विभिन्न पक्षाची सत्ता येऊन आत्ता दोन वर्ष होतील. ही अनैर्सिगक युती आहे. असा वारंवार टाहो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील फोडत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत देशात हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, असा अनेक राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जरी नवीन असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सल्यानुसार त्यांनी दोन वर्ष अडचणीच्या काळात अनेक संकटावर मात करून ठाकरे यांनी आपला ठाकरी बाणेदारपणा अवघ्या राज्यालाच नव्हे तर देशाला दाखवून दिला. आणि यातूनच भाजपच्या नेत्यांचे पित्त खवळल्यामुळे त्यांनी राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट करून केंद्रीय गुप्तचर विभाग, अंमलबजावणी संचनालय यांच्या मार्फत ससेमिरा मागे लावला. एवढेच नव्हे तर माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या नेत्यांनाही भाजपने तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी सोडले आहे. सांगण्याचे तात्पर्य भाजपला सत्ता गेल्याची दुख अजूनही पचेना. म्हणून दररोज या ना त्या मार्गाने आरोप करून महाविकास आघाडीत अस्वस्थता कशी निर्माण होईल, हाच सध्या भाजपचा कार्यक्रम असल्याचे यावरून स्पष्ट होेते. तर दुसर्या बाजूला या तिन्ही पक्षात मंत्र्यांमध्ये त्यांच्या खात्यावरून सतत कुरघोडी चालू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जी राजकीय वक्तव्य करून खळबळ उडवून दिली जेणेकरून यापुढे तरी शांत रहा, कारण आजही शिवसेना- भाजप एकत्र येऊ शकतात. हा इशाराच एका अर्थाने ठाकरे यांनी दिला असावा. भाजपमध्ये ठाकरे यांचा वक्तव्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मात्र जाम खूश झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनीही मिश्किल टिप्पणी केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अगोदरच तीन- चार दिवसांपुर्वी मला माजी मंत्री म्हणून नका, लवकरच कळेल असे भाकित केल्यामुळे आणि ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हे समीकरण जुळून आल्यामुळे भाजपच्या भुवया उंचावल्या. मात्र, महाविकास आघाडीचे संकटमोचक खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवून तुम्ही स्वप्ने पहा, असे सांगत या बाबीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
दादा कामाला लागले
राज्यातील अनेक तर्क-वितर्क यांना उधान येऊन नव्या चर्चा सुरू झाल्या. ही बाब असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठरल्या वेळेत होणार त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष या सर्वांनीच निवडणुकीला तयारी लागण्याचे आप-आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे बैठका, सभा या देखील सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने पहिल्यापासूनच स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागली आहे. तर शिवसेना देखील त्यादृष्टीने चाचपणी करत आहे. भारतीय जनता पक्ष मनसेबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असून येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ही दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. कारण, सत्तेसाठी राजकारणात काही घडू शकते, हे आजपर्यत आपण पाहिले आहे. ज्या-ज्या पक्षांचे आपले बालेकिल्ले आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक जण आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे अजित पवारांना मोठा राजकीय धक्का सहन करावा लागला. सुदैवाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अजितदादांना पुन्हा या दोन्ही महापालिका आपल्या ताब्यात कशा येतील, त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न असून ते आता कामाला लागले आहेत.
सत्तेसाठी गुंडानाही उमेदवारी?
पिंपरी- चिंचवडची सत्ता येण्यासाठी अजितदादांनी पिंपरी- चिंचवडमध्ये लक्ष केंद्रीत केले असून छोटे-मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, आजी-माजी पदाधिकार्यांना भेटणे आदी अजितदादांनी स्वतः लक्ष घातले असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना देखील कामाला लागा, असा प्रेमाचा सल्लाही दिला आहे. दादा नुकतेच एका आकुर्डीतील खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे बरेच नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. परंतु, ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांचे तांत्रिक कारणांमुळे नगरसेवक पद रद्द होऊ नये आणि निवडणूक लढवायला ते अपात्र ठरु नयेत, याची खबरदारी घेण्यास आपण सल्ला दिला आहे. ज्याची निवडून येण्याची क्षमता म्हणजेच ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या कितीतरी नगरसेवकांना पाठीमागच्या काळात मी संधी दिली. माझ्या पक्षामार्फत त्यांना तिकीट दिले. अनेक वेगवेगळी पदे दिली. ते आमच्यातूनच घडले. पण, ठिक आहे. राजकारणात चढ-उतार येत असतो. पाठीमागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. भाजप सत्ताधारी पक्षात होता. त्यावेळेस काही लोकांना भाजपमध्ये जाऊन सत्ताधारी पक्षात राहू, असे वाटत होते. आपल्या प्रभागातील कामे करता येतील, असे त्यांना वाटत होते. शहरात चांगल्या प्रकारे काम करायचे असेल तर, महापालिका ताब्यात असल्यावर कामांबाबत समन्वय साधता येतो. मी विकासाचे ‘व्हिजन’ ठेऊन काम केले. आत्ताही आमच्या ताब्यात महापालिका नसली तरी, प्राधिकरणाचा काही भाग पिंपरी महापालिकेत समावेश केला. हिंजवडीत महापालिकेच्या हद्दीत जागतिक दर्जाची भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी केली जाणार आहे. शहराचा आणखी विकास करण्यासाठी महापालिकेची सत्ता ताब्यात असावी, अशी आपली इच्छा आहे. मागे राज्यातील सत्ता भाजपकडे होती. त्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने झाला याची माहिती आता पोलिसांकडून आढावा घेत असताना पुढे येत आहे. चारचा वॉर्ड करत असताना कुठला भाग काढायचा, कुठला ठेवायचा, कोणत्या नगरसेवकाला त्रास होईल, अशी पद्धतीने भाजपने वॉर्ड रचना केली. मी अशा पद्धतीने खालच्या पातळीचे राजकारण कधीच केले नाही, असा दावा दादांनी केला. निवडून येण्याचे मेरिट म्हणजे पैसा,दादागिरी आणि गुंडगिरी असाच होतो. त्यामुळे ज्यांनी पक्षाचे वाईट काळात काम केले, त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र, मेरिट असणार्या गुंड-सुंडाना उमेदवारी मिळणार असेल तर निष्ठावंतांचे काय? असा प्रश्न राष्ट्रवादीतील सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे दादा आपणास या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
पार्थला हीच संधी
सत्तेसाठी भाजपने राष्ट्रवादीतील पदाधिकारी, नगरसेवकांना ब्लॅकमेल करून पक्षात घेतले. आणि पवित्र केले. आजपर्यंत राष्ट्रवादीत बाहेरच्या येणार्यांना मोठी पदे दिली. आर्थिक दृष्टट्या सबल केले. आता पुन्हा तोच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न राष्ष्ट्रवादीतील स्थानिक नेते योगेश बहल, संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, नाना काटे राबवित असून भाजपमधील काहींना पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न चालला आहे. त्यांनीच राष्ट्रवादीची सत्ता केवळ 27 लाख रूपयांच्या मूर्ती खरेदीवरून जे रान उठविले आणि सत्ता सोडावी लागली. त्यांना जर पक्षप्रवेश दिला जात असेल तर पुन्हा जुन्या निष्ठावंतांना केवळ संतरज्या आणि बॅनर लावण्याचेच काम करावे लागणार का? असा सुर कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीत झालेले मोठे नेते आज राष्ट्रवादीला बदनाम करत आहेत. त्याबद्दल कोणीही स्थानिक नेता ब्र शब्द बाहेर काढत नाही. हीच राष्ट्रवादीची निष्ठा का? आज पार्थ पवार यांना या निवडणुकीच्या निमित्ताने दादांनी पुढे आणण्याची गरज असून यानिमित्ताने बाहेरचा उमेदवार हा शिक्का मिटविण्याची हीच वेळ आहे. पार्थ यांना शहरातील प्रत्येक भागाची माहिती, कार्यकर्त्यांची माहिती यानिमित्ताने मिळेल. शिवाय काही चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची जवळीक साधून त्यांना यानिमित्ताने नेतृत्व करण्याची संधी द्यावी. यानिमित्ताने भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे असतील तर त्यांच्या नेतृत्वामार्फत मोर्चे, सभा, वार्ड़ बैठका घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे. यातून त्यांचे नेतृत्व तयार होईल. आणि सर्व बाबी दादांच्या मार्गदर्शनाखालीच होतील. त्यामुळे पार्थला पुर्णतः नेतृत्व करण्याची यानिमित्ताने संधी दिली तर पिंपरी- चिंचवडकरांना एक नवीन तरूण नेतृत्व मिळेल. आणि पिंपरीमध्ये कोणत्या पध्दतीने काम करावे लागते, याचा अनुभव येईल. मात्र, दादांनी पार्थबरोबर योग्य माणसांची निवड केली तर निश्चितच येत्या महापालिका निवडणुकीत पार्थ सार्थ ठरेल. ’अभी नही तौ कभी नही’ हे दादांनी ध्यानात ठेवावे. गेल्या लोकसभा, महापालिका निवडणूकीचा आपण अनुभव घेतला आहात. त्यामुळे यापुढेही आपणास ताकही फुकून प्यावे लागणार आहे.
दादा, राष्ट्रवादीतील गद्दारांना आवरा!
Reviewed by ANN news network
on
November 18, 2021
Rating:
No comments: