राजकारणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्या पक्षातील कोणाचा तरी बळी घेऊन सत्ता टिकविण्यासाठी आणि वर्चस्वासाठी राजकारण केले जाते. त्यामध्ये अनेक प्रामाणिक आणि चांगल्या कार्यकर्त्यांचा मात्र बळी जातो. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या स्वतः भोवतीच सत्ता केंद्र निर्माण केल्यामुळे अन्य कोणत्याही नेत्यांना महत्व दिले जात नाही. हे आपण पहात आहोत. महाराष्ट्राचा विचार करता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी भाजप वाढविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची शिफारस करून तरूण रक्ताला वाव दिला. मात्र, या तरूण रक्तानेच खडसे यांचे राजकीय अस्तित्व संपवून त्यांना व्यक्तीगत मानसिक छळ केला. आणि हे फडणवीस राज्यातील आणि केंद्रातल्या महत्वाच्या नेत्यांच्या जवळील विश्वासू समजले जातात. पिंपरी- चिंचवडमधील देखील असाच एक अनुभव आला असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यामध्ये जी तु-तु, मै-मै सुरू आहे, हे देखील राजकीय वर्चस्वातूनच एवढया थराला गेले आहे. सांगण्याचे तात्पर्य सर्वच पक्षात स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. मात्र, गेल्या काही महिन्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये बहल- शिलवंत-धर यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी देखील या वादात उडी घेऊन यांना अप्रत्यक्ष पाठिंबा बहल यांनी दिल्यामुळे या राजकीय वाद चिघळला असून एकंदरीत या सर्व प्रकाराचा अभ्यास केल्यानंतर ’कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या सामना चित्रपटातील गीतानुसार सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये हे राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होत आहे. त्या अगोदरच या राजकीय नाट्याचा पहिला अंक असून निवडणूक होईपर्यंत अजून दोन अंक होणार आहेत.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार आहे. तिन्ही पक्षाचे मते विभिन्न असताना देखील महाराष्ट्रात हा राजकीय प्रयोग यशस्वी ठरला. राज्यातील या सरकारला दिड वर्ष होऊन गेले. तरी भारतीय जनता पक्षाला राज्यातील पुन्हा सत्ता मिळेल, या भाबड्या अपेक्षेने वारंवार सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सरकारमध्ये देखील अंतर्गत कुरघोड्या होत असल्या तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे वारंवार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने काम करत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संकट काळ असताना देखील उत्तमरित्या काम करत आहेत. हे पवार यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी गांधी यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. गांधी यांनीही ते मान्य केले आहे. एकंदरीत भाजप या तिन्ही पक्षात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असली तरी उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात भाजपबरोबर पुन्हा घरोबा करणार नाही. हे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तर व्यक्तीगतरित्या केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. यामुळे माध्यमातून अनेक तर्कवितर्क रंगवले गेले. कारण, 2014 मध्ये महाराष्ष्ट्रातील निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी पण राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाच्या वेळी तटस्थ पणाची भूमिका घेऊन अप्रत्यक्षरित्या भाजपला पाठिंबा दिला. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि भाजप- शिवसेना सरकार सत्तेवर आले. हे राज्यातील जनता विसरली नाही. त्यामुळे पवार कधी काय करतील, हे सांगता येत नाही. मात्र, सध्या तरी ही चर्चा नाही. कारण, देशात कोरोनाचे महासंकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या राजकीय चर्चांना तुर्त तरी पुर्णविराम मिळाला आहे. एकंदरीत राजकारणात कोणत्या वेळेला काय होईल, कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. अनेक वेळा अनेक राजकीय प्रयत्न केले गेले. कधी यश आले कधी यश आले नाही. त्यामुळे ’वेट अॅण्ड वॉच’ याकडेच लक्ष ठेवले पाहिजे.
धर यांचे वर्चस्व बहल यांना खुपले
2017 च्या महापालिका निवडणुकीत बहुप्रभाग पध्दतीमध्ये सुलक्षणा शिलवंत-धर यांना संत तुकाराम नगर प्रभागमधून मागासवर्गीय संवर्गातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, संपूर्ण प्रभागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवड़ून आणायचे असेल तर मी सांगेल त्यांनाच उमेदवारी द्या, असा हट्ट योगेश बहल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यावेळी धरला होता. त्यानुसार बहल स्वत, शाम लांडे, संगिता सुवर्णा आणि सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविली. संगिता सुवर्णा यांचा पराभव झाला. त्यांच्या जागी भाजपच्या सुजाता पालांडे निवडून आल्या. आणि राष्ट्रवादीतर्फे बहल, लांडे, शिलवंत-धर या निवडून आल्या. शिलवंत-धर या सुशिक्षित असल्यामुळे भविष्यात त्यांच्या राजकीय आशा अपेक्षा ह्या उंचवणारच त्यात काही गैर नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिलवंत-धर यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवली. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म तोही मिळाला होता. मात्र, बहल यांना हे रूचले नाही. कारण, आपण 5-6 वेळा या प्रभागातून निवडून आलो आहोत. स्थायी समिती अध्यक्षपद, महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे भूषवून किंगमेकरची भूमिका बजावली. मात्र, केवळ दोन वर्षांतच शिलवंत यांनी एवढी मोठी मजल मारली हे राजकीय दृष्ट्या बहल यांना चपराक होती. कारण, स्वतः बहल देखील इच्छूक होते. मात्र, त्यांना अजितदादांनी थारा दिला नाही. शिलवंत-धर यांना उमेदवारी देण्यामागे सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा मोठा हात होता. कारण, पाटील यांनी खुद्द शरद पवार यांना सांगून उमेदवारी दिली होती. तर आमदार अण्णा बनसोडे यांनी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष म्हणून का होईना निवडणूक लढणारच, अशी भूमिका घेतली. तर बहल व त्यांच्या समर्थकांनी अजित पवार यांची भेट घेऊन शिलवंत-धर या उमेदवार असतील तर आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घेणार नाही, असे स्पष्ट बजावल्यामुळे अजित पवारांची देखील पंचाईत झाली. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून बनसोडे यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म द्या, असे फर्मावले. त्यावर बनसोडे आणि त्यांचे कार्यकर्ते सांगलीला (इस्लामपूर) गेले. आणि पहाटे एबी फॉर्म घेतला. तोपर्यंत सकाळी बहल यांनी सुलक्षणा धर यांना बरोबर घेऊन प्रभागातून फेरी काढत अर्ज दाखल करू, असा पवित्रा घेत धर या प्रभागातून निघाल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ असल्यामुळे तशी अडचण नव्हती. मात्र, अण्णा बनसोडे यांनी थेट इस्लामपूरवरून निवडणूक अधिकारी कार्यालयात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि नंतर शिलवंत-धर यांनी अर्ज दाखल केला. मात्र, प्रथम अर्ज बनसोडे यांचा होता. आणि त्या अर्जासोबत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म असल्यामुळे त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशा प्रकारे बहल यांनी धर यांच्या तोंडातील घास काढून जी गद्दारी केली आणि तीच गद्दारी पुढे हळूहळू रंगत गेली.
राजकीय अज्ञान
बनसोडे हेनिवडून आले म्हणून बरे झाले. त्यांचा पराभव झाला असता तर बहल यांची देखील राजकीय दृष्ट्या अडचणीचे झाले असते. आपली आदारकी गेली या दुखातून शिलवंत-धर या हळूहळू सावरत गेल्या. तोच 2019 मध्ये आपल्या देशात कोरोना महामारीची मोठी लाट आली. या मानवी संकटात देखील अनेकांनी गैरफायदा घेऊन आपले हात ओले केले. राजकारणी लोकांना कोणत्याही संकटाचे देणे घेणे नसते. या संकटात देखील आपण मालामाल कसे होऊ, यासाठीच या मंडळींचा खटाटोप असतो. या कोरोना महामारीत कोरोना रूग्णांसाठी अनेक ठिकाणी उपचार केंद्र उघडली. या उपचार केंद्रात देखील कागदोपत्री पुरावे न ठेवता आपल्या जवळच्या संस्थेला ठेका देऊन त्यामध्ये अप्रत्यक्ष अनेक जण भागीदार झाले. सुलक्षणा शिलवंत-धर आणि भाजपचे तुषार कामटे हे अप्रत्यक्ष भागीदार होते. स्पर्श या संस्थेमध्ये यांची भागीदारी होती. याठिकाणीही योगेश बहल यांनी स्पर्श विरोधात न्यायालयात दावा दाखल करून या प्रकरणात या दोन सदस्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला. तर मास्क प्रकरणामध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांच्या सामाजिक संस्थांना मास्कचा ठेका देऊन त्यामध्ये अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. यासंदर्भात त्यांनी आपले पती आणि भाऊ यांच्या नावाने असलेल्या कंपनीच्या नावावर एक लाख मास्क पुरविले. त्याचे सुमारे 10 लाख रूपये रक्कमही घेतली. याविरोधात जितेंद्र ननावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून उच्च न्यायालयाने जितेंद्र ननावरे यांच्या पत्रावर योग्य ती कारवाई करून त्यासंबंधीचा पूर्तता अहवाल आठ आठवड्यात द्यावा असे निर्देश दिले. तर नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीपत्रक पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. ननावरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कलम 33 ड नुसार विभागीय आयुक्तांनी या विषयाची दखल घेण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावेत यासाठी केली होती. न्यायालयाने याबाबत आठ आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निकालात माझे नावही नाही. तथापि विभागीय आयुक्तांनी यापूर्वीच ननावरे यांच्या अर्जावर ’हा विषय पालिका आयुक्तांच्या अखत्यारित असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा’ असा शेरा मारत निकाली काढला आहे.
कितीही मोठे संकट देशावर येवो, राज्यावर येवो की आपल्या शहरावर येवो याचे देणे घेणे लोकप्रतिनिधींना नसते. हे आपण कोरोनाच्या महामारीतून पाहिले आहे. बहल यांना आपण निवडून येणार याची पुर्ण खात्री आहे. मात्र, शिलवंत -धर या पुन्हा निवडून येऊ नये अथवा त्यांना उमेदवारीच मिळू नये, अशी परिस्थिती निर्माण केली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत जितेंद्र ननावरे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळू दिली नाही. शिवाय निवडणुकीतही पराभव केला. अशी परिस्थिती असताना देखील शिलवंत-धर प्रकरणात जितेंद्र यांना बहल यांनी अप्रत्यक्ष मदत करून शिलवंत-धर आणि ननावरे यांच्यात वाद लावून दिला. त्यामुळे बहल यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब काही गुप्त राहिली नाही. त्यातच शिलवंत यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर असणारी पितृछाया राहिली नाही. अशा परिस्थितीत एखाद्या पुरूषासमोर स्त्रीने लढणे म्हणजे अवघड परिस्थिती होते. अशा परिस्थितीत अजितदादांचे सुपूत्र पार्थ यांचा धर यांना पाठींबा आहे. तरी देखील बहल या ना त्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ बहल हे पार्थ यांचे नेतृत्व मानत नाहीत की काय? अशी शंका येते.
... तर राष्ट्रवादी सत्तेपासून दुर
येणार्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पार्थ पवार यांच्याकडेच सर्व जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने गेली सात ते आठ महिने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अजितदादांनीही त्यादृष्टीने व्युहरचना सुरू केली आहे. शिवाय जे महापालिकेत 5-6 वेळा निवडून आले आहेत, त्यांना उमेदवारी न देता त्यांच्या मुलांना उमेदवारी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काही ज्येष्ठांना घरी बसावे लागते की काय? शिवाय राष्ट्रवादीच्या काही मंडळींचे भाजपचबरोबर हितसंबंध असल्यामुळे राष्ट्रवादीला देखील अडचण आहे. एकंदरीत आजच्या परिस्थितीत भाजपला राष्ट्रवादी हा पर्याय आहे. मात्र, राष्ट्रवादीतील गद्दारी ही शाप ठरू शकते. त्यामुळे दादांनी काळाची पाऊले ओळखून निर्णय घ्यावा. मात्र, हा जो राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद जो सुरू आहे, तोपर्यंत पाहिले ’कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे जरी असले तरी हे वेळीच थांबले नाही. तर राष्ट्रवादी सत्तेपासून दुर राहील.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
Reviewed by ANN news network
on
November 18, 2021
Rating:
No comments: