पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्टसिटी प्रकल्पाचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांची खुर्ची धोक्यात असल्याचे वृत्त आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास खात्यातील कक्ष अधिकारी दिलीप वणिरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दि.1 नोव्हेंबर रोजी पत्र पाठविले असून अशोक भालकर यांना अधिक्षक अभियंता या संवर्गाचे पद प्रतिनियुक्तिकरिता उपलब्ध नसल्यास त्यांना प्रतिनियुक्तीवर ठेवता येईल किंवा कसे याबाबत आयुक्तांनी विचार करून योग्य तो निर्णय नियमानुसार तात्काळ घ्यावा. तसेच सह शहर अभियंता या पदावर महानगरपालिकेच्या पात्र अधिकाऱ्यास सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार व पदोन्नती समितीच्या निर्णयानुसार तातडीने पदोन्नती देण्याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असे कळविले आहे.
भालकर सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिक्षक अभियंता पदावर कार्यरत होते. ते प्रतिनियुक्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले आहेत. ते येथे आल्यानंतर त्यांची शहर अभियंता पदावर वर्णी लागणार अशी चर्चा होती. त्यामुळे महापालिकेच्या सेवेतील राजन पाटील की शासनाच्या सेवेतील अशोक भालकर या पदावर आसनस्थ होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राजन पाटील यांचे पारडे अधिक जड ठरले. भालकर यांना स्मार्टसिटीकडे पाठविण्यात आले.
स्मार्टसिटीचा कारभार ते पहात असताना नगरसेवक आणि स्मार्टसिटी प्रशासन यांच्यात अनेकदा संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. नगरसेविका आशा शेंडगे यांना अशाच एका प्रकरणात निर्माण झालेल्या वादातून पोलीस कोठडीची हवा खावी लागली.
याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. भालकर यांना शासनाकडे परत पाठवा अशी मागणी सभेत करण्यात आली. काही नगरसेवकांनी भालकर यांच्या मागील कारकिर्दीत घडलेल्या प्रकरणांचा उल्लेख अप्रस्तुत असताना देखिल सभागृहात केला. स्मार्टसिटीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर येऊ लागल्याने भालकर यांना परत पाठवून त्यांच्या जागी महापालिकेच्या सेवेतील अभियंत्यांच्या नेमण्याचा विचार आयुक्त करत असून त्या अनुषंगाने त्यांनी नगरविकास खात्याकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर नगरविकास कडून आयुक्तांना वरील निर्देश प्राप्त झाले आहेत. मात्र, अद्यापही आयुक्तांनी यावर निर्णय घेतलेला नाही. आयुक्त यावर केव्हा निर्णय घेतात आणि या पदावर महापालिकेतील कोणत्या अभियंत्यांची वर्णी लागते याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्मार्टसिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांची खुर्ची धोक्यात?
Reviewed by ANN news network
on
November 29, 2021
Rating:

No comments: