पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. या सभेत स्पर्श हॉस्पिटल गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर करण्यावरून आपण टीकेचे लक्ष्य होणार असे दिसताच आयुक्त राजेश पाटील यांनी सभेतून काढता पाय घेतला.
आरोग्य विभागातील नोकरभरती भ्रष्टाचार, स्पर्श हॉस्पिटल गैरव्यवहार, तसेच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात झालेल्या भ्रष्टाचार यावर चार तास काथ्याकूट झाल्यानंतर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता सभा आटोपली.
यातील स्पर्श हॉस्पिटल गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल पटलावर ठेवण्यात यावा असे आदेश महापौरांनी मागील दोन सर्वसाधारण सभात आयुक्तांना दिले होते. मात्र, या सभेतही हा अहवाल सभागृहासमोर आला नाही. या विषयावर चर्चा सुरू होताच आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या जागी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना आसनस्थ करून आयुक्तांनी सभागृहातून काढता पाय घेतला. नगरसेवकांनी हा अहवाल सभागृहासमोर का आणला नाही याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी केल्यानंतर आयुक्त पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सभागृहासमोर येऊ शकत नसल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी केला.
स्पर्श हॉस्पिटल गैरव्यवहार प्रकरणात आयुक्त पाटील यांच्यावर दोन्ही बाजूंनी राजकीय दबाव असल्याची चर्चा असून त्यामुळेच या पेचात अडकलेल्या आयुक्तांनी सभागृहातून काढता पाय घेतला असावा अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यात सुमारे पाच हजार भटक्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे भासवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप सभागृहात केला. या काळात रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरत नसताना ही कुत्री कुणी आणि कोठून पकडून आणली असा सवाल बहल यांनी सभागृहात विचारला. त्याचबरोबर या काळात वैद्यकीय घनकचरा वाहून नेणाऱ्या ठेकेदार कंपनीने एकदाही कचरा वाहून नेला नसल्याची माहिती आपणाला माहिती अधिकारात मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
सभागृह नेता नामदेव ढाके यांनी या विषयी बोलताना बहल यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. काही जण स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी असे आरोप करून सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला त्यांनी बहल यांचे नाव न घेता लगावला.
नगरसेविका सीमा सावळे यांनीही आयुक्तांवर शाब्दिक शरसंधान साधले. आयुक्त अहवाल सभागृहासमोर आणण्यात हेतुपुरस्सर दिरंगाई करून महापौरांचा आणि पर्यायाने संपूर्ण शहराचा अपमान करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
विरोध पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे आदींनी प्रशासनावर वचक ठेवून विकासकामे करण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे मत सभागृहात बोलताना व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून आयुक्तांचा काढता पाय
Reviewed by ANN news network
on
November 18, 2021
Rating:
No comments: