सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे, डांगे चौक ते ताथवडे चौक आणि औंध ते रावेत या रस्त्यांच्या सुशोभीकरण आणि डांबरीकरणाच्या नावाखाली भाजपने आर्थिक लूट चालविली आहे; असा आरोप शिवसेना गटनेता राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी दि. 19 जानेवारी रोजी केला. आणि, त्यानंतर अवघ्या 15 दिवसात राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी या कामास आमचा विरोध नाही. काम झालेेेच पाहिजे असे म्हणत मुद्द्यापासून घूमजाव केले. दि. 19 जानेवारी रोजी या दोघांनी सुमारे 100 पत्रकारांना घेऊन या रस्त्याचा पहाणी दौरा केला होता. आणि, या रस्त्याच्या कामाची गरज नाही. उलट, पादचारी मार्ग वाढवून रस्ता अरुंद होणार आहे. यामुळे अपघात होतील. असे सांगत असा जनतेचा कळवळा असल्याचे भासविले होते. मात्र, अवघ्या पंधराच दिवसात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या पदाधिकार्यांना असा कोणता साक्षात्कार झाला. की हा रस्ता झालाच पाहिजे असे त्यांना वाटू लागले हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. कलाटे शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्तांनी कामाबाबत नव्याने निविदा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांचे कौतुक करून हा रस्ता झालाच पाहिजे. आमचा या तेव्हाही विरोध नव्हता आणि आताही विरोध नाही असे म्हटले. त्यामुळे त्यांचा या विषयाला नेमका विरोध कशासाठी होता? आणि कोणते ’ अर्थपूर्ण’ स्पष्टीकरण आयुक्तांनी त्यांना दिले, की त्यांचा दृष्टीकोन बदलला? असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. पत्रकारांचा वापर करून आपणाला शहराची किती तळमळ आहे असे दाखवत आपला कार्यभाग साधणार्या या दोन नेत्यांनी पत्रकारांना मूर्ख समजू नये एव्हढे लक्षात ठेवावे. या प्रकारामुळे कलाटे आणि शितोळे यांचे घूमजाव कशासाठी हे आता जनतेला कळून चुकले आहे.
महापालिकेने अत्यंत उत्तम स्थितीत असलेल्या सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे,डांगे चौक ते ताथवडे चौक आणि औंध ते रावेत या रस्त्यांच्या सुशोभीकरण आणि डांबरीकरणाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. यातील 40 कोटी रुपयांचे काम कोणतीही निविदा न मागविता थेटपद्धतीने एका ठेकेदाराला देण्याचा घाट घातला आहे. याची माहिती पत्रकारांना देण्यासाठी 19 जानेवारी रोजी कलाटे आणि शितोळे यांनी पाहणीदौरा आयोजित केला होता. त्यावेळी साधा एक खड्डाही नसलेल्या या रस्त्यावर महापालिका 100 कोटी रुपये का उधळू पहात आहे, असा प्रश्न त्यावेळी कलाटे, शितोळे यांनी उपस्थित केला. शिवाय, महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबतही या दोघांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गरज नसलेली ही कामे काढून आणि विनानिविदा 40 कोटी रुपयांचे काम थेट पद्धतीने देऊन महापालिका प्रशासन सत्ताधार्यांना निवडणूक निधी गोळा करून देत आहे का? असे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर राज्यशासनाकडे या विषयी तक्रार केली जाईलच परंतु या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागून गल्लाभरू सत्ताधार्यांना मदत करणार्या महापालिका प्रशासनालाही उघडे पाडले जाईल अशी गर्जनाही या दोघांनी यावेळी केली होती.
या वेळी ते म्हणाले, औंध रावेत रस्ता चांगला आहे. रस्त्यावर एकही खड्डा नाही. हा रस्ता पुणे-पिंपरी-चिंचवडला जोडणारा आहे. हिंजवडीलाही या रस्त्यानेच जाता येते. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकसित केल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. 14 कोटी 74 लाख 63 हजार 604 रुपये खर्चून सांगवी फाटा ते कावेरीनगर सबवे पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईननुसार तयार करणे, 16 कोटी 27 लाख 27 हजार 474 रुपय खर्चून डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता तयार करणे आणि 30 कोटी 96 लाख 46 हजार 112 खर्चून औंध ते रावेत रस्त्याचे डांबरीकरण, चेंबर समपातळीस करणे व अनुषंगिक कामे करणेअशी सुमारे 62 कोटी रुपयांची कामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून यातील 30 कोटी रुपयांची सुरू करण्यास आयुक्तांनी कार्यादेशही दिला आहे.
शिवाय तब्बल 40 कोटी रुपयांचे काम स्मार्ट सिटीच्या एका ठेकेदाराला थेट पद्धतीने देण्याचा घाट घातला आहे. आपण या उधळपट्टीला विरोध केल्यामुळे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असूनही सध्या थांबली आहे असे कलाटे त्यावेळी म्हणालेहोते.
या रस्त्यांवर कोणत्याही कामाची गरज नसताना नाहक 100 कोटी रुपये उधळले जाणार आहेत. या प्रकारात सत्ताधार्यांबरोबरच काही अधिकारीही सामील असून त्यांनी आयुक्तांना अक्षरश: फसविले आहे. तर, सत्ताधारी निवडणूक निधी गोळा करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणत कामे काढत आहेत असा आरोप यावेळी कलाटे आणि शितोळे यांनी केला होता. एव्हढेच नव्हे तर, यासाठी आयुक्तांकडे मागणी करूनही आयुक्त सुनावणीसाठी वेळ देत नाहीत असेही ते म्हणाले होते.
सवणे यांच्यावर कोणाचा वरदहस्त?
यासर्व प्रकारानंतर माध्यमांनी या प्रकरणाला व्यापक प्रसिद्धी दिल्यानंतर गडबडलेल्या महापालिका प्रशासनाने बीआरटीएसचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकरवी सर्व माध्यमांना खुलासा पाठविला. त्यात सांगवी- किवळे 45 व 30मी. रूंदीचा बीआरटीएसरस्ताविकास आराखड्याच्या प्रमाणे विकसित करताना सात पॅकेजेमध्ये सन. 2007 साली निविदा काढून केलेले आहे. जगताप डेअरी ते किवळे मुकाई चौक रस्त्यांची विकसनाची/डांबरीकरण करण्याची कामे 2012 साली पूर्ण झालेली आहेत. डांबरी रस्त्याचा दोषदायीत्व कालावधी 3 वर्षे इतका असूुन सुमारे 9 ते 10 वर्षे इतका कालावधी काम पूर्ण होऊन झाला आहे व तेव्हापासून या रस्त्यावर पदपथ सेवा रस्त्यांमधून विविध सेवावाहिन्यांच्या केबल्स, गॅस पाईपलाईन, पाण्याच्या लाईन्स, ड्रेनेज वाहिन्या, डिफेन्स विभागाची केबल, महाजनको महापारेषणची केबल्स इत्यादीमुळे सेवा रस्ता व पदपथाची अनेकदा खोदाई केल्यामुळे नादुरुस्त/खराब झालेला आहे. तसेच या रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते डांगे चौक यादरम्यान तीन उड्डाणपूल व तीन सबवे च्या बांधकामांमुळे सेवा रस्ता व पदपथ पूर्णतः खराब झालेला आहे. सदरचा भाग हा दाट लोकवस्तीचा भाग असून खराब झालेले सेवारस्ते व पदपथांची कामे करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याचे डांबरीकरणाचा वरचा थर खराब झाला असून अनेक ठिकाणी त्याची रायडींग क्वालिटी खराब झाली आहे. त्याची रफनेस टेस्ट केलेली आहे व चाचणीनुसार या रस्त्याचा रफनेस इंडेक्स आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे त्याचे सध्यस्थितीत डांबरीकरण करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे. डांबरीकरण कामाचा दोषदायित्व कालावधी तीन वर्ष पूर्ण होऊन त्यावर सहा ते सात वर्ष झालेली आहेत. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी नादुरुस्त खराब झालेला आहे. आयुक्त यांनी शहर अभियंता (बीआरटीएस) व इतर अधिकार्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे त्यानुसार सदर रस्त्यांच्या पदपथ बांधणी व डांबरीकरण करणे या कामाच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केलेल्या आहेत व कार्यवाही चालू आहे. असा खुलासा केला. हा खुलासा करणार्या सवणे यांनी एकदा पत्रकारांसमवेत हा रस्ता पाहणीचा दौरा करावा म्हणजे त्याना रस्ता खराब असल्याचे जे स्वप्न पडले आहे. त्या स्वप्नातून जाग येऊन हा रस्ता उत्तम असल्याचे साक्षात दर्शन होईल. सवणे यांची बदली होऊन ते हजर झाले नाहीत. उलट 2 महिन्यांनी त्यांना पुन्हा आहे त्याच जाग्यावर ठेवण्यात आले. कोणाचा पाठिंबा सवणे यांना आहे? की, महापालिका आयुक्त राजेश पाटील देखील त्यांची बदली रद्द करू शकतात?. यावर खुद्द राहुल कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सवणे हे दररोज सकाळी चिंचवडच्या आमदारांच्या दरबारात हजेरी लावत असतात. आणि त्यामुळेच ते महापालिकेत कोणालाही जुमानत नाहीत. त्यामुळे इतरांच्या बदल्या रद्द झाल्या नाहीत. मात्र, सवणे यांची बदली रद्द केली. असा आरोप केला. याचा अर्थ आयुक्त सवणे यांना घाबरतात? एकंदरीतच सवणे यांच्या महापालिकेतील कारभाराची आणि कामकाजाची एक समिती नेमून सविस्तर चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल. आणि हे ही होत नसेल तर या रस्त्याची व्हिडिओ फिल्म तयार केली असून ती फिल्म राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात दाखल करून यावर न्याय मागावा लागेल.
’अर्थपूर्ण’समझोता?
दरम्यान, दैनिक केसरीतील वृत्ताची आयुक्तांनी दखल घेऊन दुसर्याच दिवशी अधिकार्यांची बैठक घेत या 40 कोटींच्या कामावर चर्चा करून थेट काम देण्यापेक्षा या कामाची निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. आणि 15 दिवसांनंतर या विषयावर कलाटे आणि शितोळे यांची आयुक्तांबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांचे ’अर्थपूर्ण’ समाधान झाले. लगेचच, कलाटे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ’आयुक्तांनी 40 कोटी रुपयांचे काम थेट देण्यात येणार नाही. त्याची निविदा काढली जाईल. असे आपणाला लेखी दिले आहे. त्यामुळे आयुक्तांचे आपण अभिनंदन करतो’असे म्हणत या मुद्द्यावर चक्क घूमजाव करून याप्रकरणी काही झालेच नाही असा आव पत्रकारांसमोर आणून आम्हाला शहराच्या विकासाची आणि विकासकामांवर होणार्या उधळपट्टीची किती चिंता आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी पिंपरी चिंचवडकरांना हे काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षत महापालिकेचे आर्थिकदृष्ट्या लचके कशाप्रकारे तोडले गेले आहेत याचा अनुभव आहेच.
कलाटे यांनी औंध ते किवळे या 14 किलोमीटर रस्त्याची पाहणी पत्रकारांच्या समवेत केली असता ठिकठिकाणी पाहणी करत असताना हा किती उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एव्हढेच नव्हे तर ज्या भागात वस्ती नाही अशा भागात पादचारी मार्ग 7 मीटरचा करून रस्ता अरुंद होत आहे ते देखील दाखविले. उलट, पादचारी मार्ग केल्यास दररोज मोठे अपघात होतील. कारण या रस्त्यावरून मुंबई अथवा सातार्याला जाणार्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल आणि दररोज मोठे अपघात होतील हे स्वत: कलाटे आणि शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ही वस्तुस्थिती खरी आहे.काही भागात तर पादचारी मार्गच अस्तित्वात नाही. तर, मग या कामाचा समावेश कसा असाही प्रश्न उपस्थित होतो. स्मार्टसिटीच्या नावाखाली जो सध्या हैदोस सुरू आहे त्याचेही ऑडिेट होण्याची गरज आहे. एव्हढेच नव्हे तर स्मार्टसिटीच्या कामात 400 कोटी रुपयांचा घोटाळा आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. या कामाची का चौकशी होत नाही? आज स्मार्टसिटीचा गवगवा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. सांगवी, पिंपळे सौदागर हा मुळातच विकसित भाग आहे. त्या ठिकाणीच स्मार्टसिटीचे काम करून स्मार्टसिटी प्रकल्पाचे केंद्रशासनातील उच्चाधिकारी कुणालकुमार यांना तो परिसर फिरवून दाखवला आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. खरे तर या अधिकार्याला भोसरी, काळेवाडी, रहाटणी, रुपीनगर या भागात फेरफटका मारायला सांगा मग स्मार्टसिटीचे खरे रुप त्यांना दिसेल. त्यामुळे महापालिका अधिकार्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेणे बंद करावे.
आयुक्तानी अधिक जरब बसवावी
आयुक्त राजेेश पाटील यांनी नुकत्याच प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या केल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यामुळे प्रशासनात मक्तेदारी संपुष्टात आली. कारण यापूर्वी यामंडळींनी बदल्या आणि बढत्यांमध्ये अनेकांकडून आर्थिक लाभ घेऊन अनेकांची वर्णी लावली. व ज्यांचा अधिकार आहे त्यांना वंचित ठेवण्यात आले. प्रशासनामध्ये अजूनही दोन लिपिक आहेत. त्यांच्या बदल्या करण्याची गरज आहे. शिवाय प्रशासनातील काहीजणांचे टेबल बदलले तर बरीच पारदर्शकता येईल. त्याचबरोबर राजेंद्र शिर्के हे महापालिका आयुक्तांचे स्वीयसहाय्यक होते. त्यावेळी त्यांना लाच घेताना पकडले. त्यांचे निलंबनही झाले. त्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नियुक्त केले. सध्या ते रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्या विश्वासातील असल्यामुळे त्यांना ते सल्ला देतात. त्यामुळे वाबळे एखाद्यादिवशी अडचणीत येतील कारण शिर्के यांची अजूनही पूर्वीची सवय न गेल्यामुळे त्याठिकाणी त्यांनी चांगलाच जम बसविला आहे. याठिकाणीही आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कारण हळूहळू महापालिकेतल्या बारीकसारीक गोष्टी आयुक्तांना समजू लागल्या आहेत.
शंभर कोटींच्या रस्त्याच्या कामाला विरोध करणारे कलाटे आणि शितोळे यांनी पोटतिडिकेने हा विषय प्रसारमाध्यमांसमोर आणून हा खर्च करू नये अशी आग्रही मागणी केली. मात्र, आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत या महाशयांना हे काम आवश्यक असल्याचा साक्षात्कार झाला याचे आश्चर्य वाटत आहे.लोकप्रतिनिधींनी अशी दुतोंडी भूमिका घेतली तर जनता हे पाहत असते हे विसरू नये. कारण शेवटी जनतेच्या दरबारातच न्याय मागावा लागतो. या ’घूमजाव’ मुळे भाजपबरोबर अंतस्थ समझोता झाला आहे की काय? अशीही शंका आता येऊ लागली आहे.
कलाटे, शितोळे यांचे घूमजाव कशामुळे ?
Reviewed by ANN news network
on
February 09, 2022
Rating:
Great article with lots of insight and exposure into the corrupt ways of PCMC going on for years together. My one point of difference of opinion is why is the Commissioner being let off lightly when he instead of cancelling the 100 crores tender goes on to convince Kalate and Shitole to take a U turn. Patil too is clearly guilty as are Kalate and Shitole.
ReplyDelete